‘सावरकर’ एक नाट्यप्रवास…

नमस्कार मंडळी…रामराम! आज ‘महाराष्ट्र देशा’ ई-वृत्तापत्रासाठी लेख लिहिण्याची ही माझी पहिलीच वेळ. यापूर्वी महाराष्ट्र टाईम्स सारख्या वृत्तपत्रातून माझे काही लेख प्रसिद्ध झाले आहेत. ‘महाराष्ट्र देशा’च्या दिपक पाठक यांनी माझ्याशी फेसबुक वरून संवाद साधला आणि त्यांचा अचानक कॉल आला; म्हणाले, ‘म्हणाले महाराष्ट्र देशा या ई-वृत्तपत्रासाठी लिहाल का?’ मी त्वरित होकार दिला. मी अनेक नाटकातून काम करत असल्याने त्यांनीच मला विषय दिला की, नाटकाच्या संदर्भात काही लिहा. आजकाल अनुभव कथन किती लोकांना आवडतं हे माहीत नाही; पण नाटकाविषयी लिहिण्यापेक्षा नाटकातल्या अनुभवांविषयी लिहावं म्हणजे किमान त्या कमी चर्चिल्या जाणाऱ्या विषयाची माहिती तरी होईल, म्हणून हा विषय निवडला. माझं पाहिलं नाटक म्हणजे ‘होय! मी सावरकर बोलतोय!’ – आता कुठे नावारूपाला येत असलेलं. या नाटकाने इतके अनुभव दिलेत की या नाटकाचा नाट्यप्रवास लिहावा असं ठरवलं.
          “होय! मी सावरकर बोलतोय!” सावरकर म्हणजे कोण असं कुणी विचारलं तर नाटककार प्रदीप दळवी यांच्या एका प्रसिद्ध नाटकातील सावरकरांचं वर्णन अगदी याथोचित वाटतं. दळवी म्हणतात, ‘सूर्याची उबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडकानंही हेवा करावा अशी कठोरता आणि साक्षात बृहस्पतीनंही शिष्यत्व पत्करावं इतकी विचारांची प्रगल्भता आणि या साऱ्यांनी धारण केलेले मानवी अवतार म्हणजेच तात्याराव (स्वातंत्र्यवीर) सावरकर!’ सावरकर म्हणजे त्याग, सावरकर म्हणजे देशभक्ती, सावरकर म्हणजे विनय, सावरकर म्हणजे साहस, सावरकर म्हणजेच संसार आणि सावरकर म्हणजेच संन्यास. या अशा बहुआयामी व्यक्तिमत्वावर आणि त्यातही राजकीय जीवनावर भाष्य करणारं नाटक म्हणजेच अनंत शंकर ओगले लिखित ‘होय! मी सावरकर बोलतोय!’
          हे नाटक सावरकरांच्या राजकीय पैलूचं दर्शन घडवणारं असल्याने हे नाटक अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शन या तिरंगी भूमिकेतून पेलणं माझ्याकरता आव्हानंच होतं. सावरकर नाटकात अभिनेता म्हणून काम करण्याचा किंवा न करण्याचा विचार अजून पक्का नव्हता. तशीच वेळ आली तर नाटकाच्या भल्यासाठी म्हणून मी त्यात भूमिका करणं नाकारलंही असतं. पण या नाटकाची निर्मिती करण्याचं कठीण उत्तरदायित्व मात्र माझ्याच माथी आलं. साधारण ऑगस्ट २०१५ चा काळ होता. स्वातंत्र्यवीर सावरकर हे माझं दैवत असल्याने त्यांच्यावरील हे नाटक रंगमंचावर यावं अशी माझी मनापासून इच्छा होती. मी महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याने याच काय पण कुठल्याही नाटकाची निर्मिती करणं मला आर्थिकदृष्ट्या परवडणारं नव्हतं, आणि त्यात गाठीशी शून्य अनुभव! त्यामुळे या नाटकाला कुणी निर्माता मिळतो का म्हणून नाटकाचं स्क्रिप्ट घेऊन हिंडत होतो. सोबत होता माझा मित्र सचिन घोडेस्वार – नाट्यक्षेत्रातलाच.  याच काळात नथुराम गोडसे यांच्यावरील ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटक तुफान चालत होतं. कदाचित शरद पोंक्षे काम करतात म्हणूनही असू शकेल, पण नाटकाला ‘बुकिंग’ होतं. मात्र ‘नथुराम’ सारखं नाटक पेलवणाऱ्या निर्मात्यानेही ‘सावरकर’ नाटक नाकारलं – न बघताच, न वाचताच! त्यांना म्हणे ‘नाववाला’ आर्टिस्ट हवा होता बुकिंगसाठी. त्यालाही मी तयार होतो पण त्यांनी फारसा उत्साह दाखवला नाही. शेवटी कसंही करून ‘सावरकर’ नाटक रंगमंचावर आणायच्या इच्छाशक्तीने ‘नट’ व्हायला आलेला मी, ‘प्रोड्युसर’ झालो. कसेबसे पैसे उभे केले आणि कमी खर्चात नाटकाची निर्मिती झाली.
          पण दुर्दैव पाठ सोडेनाच. कारण नाटक उभं करताना जेवढी दमछाक झाली नाही तेवढी नाटकातल्या २-३ कलाकारांचे नखरे सांभाळण्यात झाली. १ ऑगस्ट २०१५ ला नाटकाचं वाचन झालं शिवाजी उद्यानातील (पार्कतील) सावरकर स्मारकात आणि नाटक प्रत्यक्ष रंगमंचावर आलं ते १ नोव्हेंबर या दिवशी. शुभरंभाच्या प्रयोगाच्या २-३ दिवस आधी एका नटाने वैयक्तिक करण देऊन नाटक करत नसल्याचं सांगून धक्का दिला. त्याची भूमिकाही मोठी आणि महत्वाची होती. नाटकाचा पहिलाच निर्मितीचा अनुभव असल्याने त्वरित नवी व्यक्ती उभी काशी करावी ते समजेना. शेवटी त्याला कसंबसं करून हातापाया पडून तयार केलं आणि सावरकर नाट्यगृह शिवाज उद्यान इथंच नाटकाचा पहिला प्रयोगही झाला. निर्मात्याला कलाकारांना मुठीत ठेवावं लागतं हे हळूहळू समजत गेलं. (समजलं असलं तरी अजूनही जमलेलं नाहीच.)
          यानंतर नखरे करणारे आर्टिस्ट बदलले गेले. ३ ऱ्या प्रयोगानंतर जवळजवळ ५०% कास्टिंग बदललं गेलं, संहितेत काही अपेक्षित बादल केले गेले आणि दिग्दर्शन सुनिल जोशी यांच्याकडे सोपवून मी जरा माझ्या खांद्यावरील ओझं हलकं केलं. ४ थ्या प्रयोगानंतर नाटकाची घोडदौड सुरू झाली. मुंबई, पुणे, कोल्हापूर, संभाजीनगर, नांदेड आशा अनेक ठिकाणी प्रयोग सादर झाले. महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, पुढारी, सामना, सकाळ, तरुण भारत अशा महाराष्ट्रातील अनेक मुख्य वृत्तपत्रांनी नाटकाला प्रसिद्धी दिली. २०१७ च्या फेब्रुवारीमध्ये नाटकाचं परीक्षण होऊन महाराष्ट्र शासनाचं अनुदान प्राप्त करण्यातही यश मिळालं.
          या मधल्या काळात बरेच बरे वाईट अनुभव येऊन गेले. सावरकर द्वेषींकडून नाटकावर टीका तर अजूनही होत असतात. सावरकर विचारांचे अभ्यासक प्रा. शेषराव मोरे यांनीही नाटक पाहून असं मत दिलं की, ‘नाटकात सावरकरांविषयीच दाखवा. नाटकातले गांधीहत्येचे आणि नथुरामचे संदर्भ काढून टाका.’ काहीही झालं तरी सावरकरांच्या जीवनातून गांधीवध किंवा नथुरामचा संदर्भ वगळता येणं हे केवळ अशक्य आहे. करण तथाकथित सत्यवादी गांधीपूजाऱ्यांनीच ‘सावरकर प्लस नथुराम इज इक्वल टू गांधीज अस्यासिनेशन’ हे समीकरण रूढ केलंय. पण आम्ही नाटकातील नथुराम आणि गांधीवधाचा उल्लेख काढणार नाही यावर ठाम आहोत. कारण सावरकरांचा गांधीवधात काडीमात्रही सहभाग नव्हता हेच सत्य आम्ही मांडत आहोत. अशा अनेक टीकाटिप्पणी केल्या गेल्या तरी तितकेच सुंदर अनुभव नाटकाच्या दौऱ्यांच्या निमित्ताने आले. कोल्हापूरसारख्या प्रयोगात तर लोक कलाकारांच्या पाया पडले. ‘आम्ही सावरकर, सुभाषबाबू, डॉ. आंबेडकर पाहिले नाहीत; पण ते कसे दिसत असतील, बोलत असतील ते तुमच्याकडे पाहिल्यावर समजतं.’ अशा टोकाच्याही प्रतिक्रिया आल्या. खरंच, अशा मोठ्या देवतातुल्य माणसांची आमच्याशी कधीही तुलना करता येणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर तर ‘तो राजहंस एक ‘ याच पठडीत बसणारे आहेत. आज प्रेक्षक या नाटकाला येतात ते कलाकाराचं नाव आणि प्रसिद्धी पाहून नाही, तर केवळ स्वातंत्र्यवीर सावरकर या व्यक्तीच्या देशभक्तीमुळेच!
– आकाश भडसावळे
( लेखकाच्या मताशी “महाराष्ट्र देशा ” सहमत असेलच असे नाही )
      तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा  संपर्क