ऑनलाईन शिष्यवृत्तीमधून संस्थांच्या खात्यात शिक्षणशुल्क जमा करण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करु-विनोद तावडे

vinod tawade

नागपूर: विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये शिष्यवृत्तीची रक्कम जमा करताना त्यापैकी शिक्षणशुल्काची रक्कम थेट संबंधित महाविद्यालयाकडे वर्ग व्हावी यासाठी नवीन संगणकीय प्रणाली (सॉफ्टवेअर) विकसित करण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत सांगितले.

सदस्य डॉ. सुधीर तांबे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. श्री. तावडे पुढे म्हणाले की, यापूर्वी काही वेळा शिष्यवृत्यांच्या बाबतीत अनियमितता होत होत्या. काही प्रकरणात शिष्यवृत्तीसाठी एकच विद्यार्थी एका पेक्षा जास्त महाविद्यालयात शिकत असल्याचे दाखविले जायचे. त्यामुळे राज्य शासनाने विद्यार्थांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे थेट विद्यार्थ्याच्या खात्यावर शिष्यवृत्ती जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, शिक्षणसंस्थांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ नये म्हणून शिष्यवृत्तीच्या रकमेतून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या खात्यावर शिक्षण फी जमा करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सॉफ्टवेअर विकसित करण्यात येईल.

ते पुढे म्हणाले की, यावर्षी शिष्यवृत्ती वितरण ऑफलाईन पद्धतीने करण्याची मागणी संस्था व विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यानुसार सामाजिक न्याय विभागाप्रमाणे शिष्यवृत्त्या ऑफलाईन पद्धतीने वितरण करण्यासाठी वित्त विभागाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविला आहे.

या लक्षवेधीवरील चर्चेत सदस्य सर्वश्री जोगेंद्र कवाडे, हरिसिंग राठोड, निरंजन डावखरे यांनी सहभाग घेतला.