दहावीच्या कलचाचणीचे निकाल जाहीर

मुंबई – दहावीच्या परिक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या कलचाचणीचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. 2018 मध्ये 17 लाख 36 हजार 104 विद्यार्थ्यांनी कलचाचणी दिली होती. यावर्षी वाणिज्य म्हणजेच कॉमर्स विभागाकडे विद्यार्थ्यांचा कल सर्वाधिक दिसून आला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही आकडेवारी जाहीर केली आहे.

या कल चाचणीच्या निकषानुसार दहावीनंतर २१ टक्के मुलांना वाणिज्य क्षेत्रात तर १२ टक्के मुलांना आरोग्य व विज्ञान क्षेत्रात जायचे आहे,या कलचाचणीचा सविस्तर अहवाल www.mahacareermitra .in वर उपलब्ध असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.

ही कल चाचणी विद्यार्थ्यांचे ७ प्रमुख क्षेत्रातील कल परीक्षण करते. २०१७ च्या कल चाचणी अहवालानुसार विद्यार्थ्यांचा सर्वात जास्त कल हा ललितकला म्हणजेच फाईन आर्टस् क्षेत्रात सर्वाधिक दिसून आला होता. तर या वर्षी २०१८ मध्ये वाणिज्य मध्ये सर्वाधिक कल दिसून येत आहे.शैक्षणिक भविष्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी या उद्देशाने २०१६ पासून राज्य शासनाच्या १० वीच्या परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कलचाचणीचा उपक्रम सुरू करण्यात आला. ज्याअंतर्गत या मुलांचा कल ओळखू शकणारी कल चाचणी घेण्यात येते असंही यावेळी तावडे यांनी सांगितले.