fbpx

शरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे

टीम महाराष्ट्र देशा : सध्या राज्याच्या राजकारणात जातीपातीच्या राजकारणानी पुन्हा एकदा जोर पकडला आहे. सत्तधारी आणि विरोधकांमध्ये जातीपातीच्या राजकारणाचे आरोप केले जात आहेत. असंच एक आरोप राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे. शरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले. मुख्यमंत्रीपद आणि मंत्रीपदं भूषविली, कुटुंबातील इतरांना पदे मिळवून दिली, असा आरोप तावडे यांनी केला आहे.विनोद तावडे आज प्रसार माध्यमांशी बोलत होते.

शरद पवार यांनी एका मुलाखतीमध्ये फडणवीसांची जात मी गेल्या पाच वर्षात कधी काढली ? असा सवाल केला तर या याच प्रश्नाला उत्तर देत विनोद तावडे यांनी छत्रपती संभाजी राजे यांची खासदार पदी नियुक्ती झाल्यानंतर पवार यांच्या वक्तव्याचे उदाहरण देत पवार जातीयवादी असल्याचा आरोप केला. त्यावेळी शरद पवार यांचे वक्तव्य होते की, जुन्या काळात छत्रपती फडणवीस नेमायचे, आता फडणवीस छत्रपतींना नेमायला लागले आहेत. त्यामुळे इतका विखारी जातीयवाद हा शाहु, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात शरद पवार यांच्यामुळेच पाहायला मिळाला आहे, असा घणाघात तावडे यांनी यावेळी केला.

तर आजच्या तरुणांना हे अजिबात आवडत नाही, विकासावरच राजकारण केले पाहिजे आणि प्रगतीवरच राजकारण केले पाहिजे, असा हा पुरोगामी छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र मानतो असेही तावडे यांनी यावेळी सांगितले.