fbpx

शरद पवारांना विचारा, अन्यथा पुढची स्क्रीप्ट मिळणार नाही, विनोद तावडेंचा राज ठाकरेंना टोला

मुंबई: मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे. यानंतर आता भाजपकडून राज यांना टार्गेट केल जात आहे. ‘ राहुल गांधी हे पंतप्रधान म्हणून शरद पवारांना चालतील का, हे आधी शरद पवारांना विचाराव, अन्यथा राज यांना पुढच्या स्क्रिप्ट मिळणार नाहीत, असा टोला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लगावला आहे.

देश संकटात असतो तेव्हा वेगळा विचार करणं आवश्यक असतं. संकटातून देश काढायचा असेल तर त्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो, मोदी आणि शहामुक्त भारत व्हावा म्हणून निवडणूक न लढविता मी महाराष्ट्रभर सभा घेणार आहे, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले, तसेच राहुल गांधी यांना एक संधी देण्यास काय हरकत नाही . एकतर देश खड्ड्यात घालतील किंवा चांगले देखील करून दाखवतील. असा विश्वास राज यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, पंतप्रधान पद हा खेळ नसून देशाचा प्रश्न आहे, देश खड्ड्यात घालायला राहुल गांधींना पंतप्रधान करा, म्हणायला तो काय मनसे पक्ष आहे का? अशी टीका विनोद तावडे यांनी केली आहे.

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरत मोदी – शहा यांना हद्दपार करण्याचा संकल्प मनसे मेळाव्यात केला आहे. यासाठी निवडणूक न लढविता महाराष्ट्रभर सभा घेणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे. मोदींना हटवा म्हंटल्यावर अनेक लोक म्हणतात दुसरा पर्याय काय ? पण देशाच्या स्वातंत्र्यापासून आपल्यासमोर कधीचं पर्याय नव्हता. महात्मा गांधींनी ठरविले म्हणून नेहरू पंतप्रधान झाले. पुढे जेवढे पंतप्रधान झाले त्यांच्याशिवाय लोकांना पर्याय होता का? मग आत्ताचं ही पर्यायाची चर्चा का केली जाते, एकदा मोदींना संधी दिली, त्यांनी देश खड्ड्यात घातला. आता राहुल गांधींना संधी देऊन बघू या. असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.