रमेश भाटकर यांच्या निधनाने अभिनयातला ‘कमांडर’ गेला : तावडे

मुंबई: हॅलो इन्स्पेक्टर,दामिनी,कमांडर,बंदिनी अशा मालिकांमुळे घराघरात प्रसिद्ध असणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांच्या निधनाने अभिनयातला ‘कमांडर’ गेला, अशी भावना सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली आहे.

तावडे आपल्या शोकसंदेशात म्हणतात, नुकत्याच पार पडलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 2018 मध्ये रमेश भाटकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. रंगभूमी, सिनेमा आणि मालिका अशा तिन्ही ठिकाणी काम करुन आपल्या अभिनयाची छाप रमेश भाटकर यांनी प्रेक्षकांच्या मनावर उमटविली होती. गेल्या अनेक वर्षांत तिन्ही माध्यमांमध्ये साकारलेल्या त्यांच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांच्या निधनाने हरहुन्नरी कलाकार कायमचा गमावला आहे.