Vinayak Raut | “आरोपी आंबेरकर राणेंचा साथी”; पत्रकाराच्या हत्येवरुन विनायक राऊतांचा गंभीर आरोप

Vinayak Raut | मुंबई : कोकणातील पत्रकार शशिकांत वारीशे यांचा 6 फेब्रुवारीला अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर वारीशे यांना कोल्हापूरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता, 7 फेब्रुवारीला त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालक पंढरीनाथ आंबेरकरला अटक करण्यात आली आहे. पण, हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर गंभीर आरोप केला आहे.

विनायक राऊत काय म्हणाले?

“रिफायनरी आणि जमीन दलालांच्या विरोधात मागच्या अनेक वर्षापासून आवाज उठवणारे शशिकांत वारीशे यांचा घातपात झाला आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता, न्यायासाठी लढणारे म्हणून वारिशे यांचा उल्लेख होता. वारिशेंच्या हत्येचा पोलिसांनी योग्य तो तपास करावा,” अशी मागणी विनायक राऊत यांनी केली आहे.

“आंबेरकर राणेंबरोबर, त्यांच्या चिथावणीमुळेच पत्रकाराच्या हत्येचं षडयंत्र” -(Vinayak Raut)

“सिंधुदुर्गमध्ये जिल्हा नियोजनची बैठक झाली होती. भाजपचे जबाबदार केंद्रीय नेते यांनी जिल्हा नियोजनच्या बैठकीत मालवचं सी-वर्ल्ड आणि रिफायनरी याच्याविरोधात येणाऱ्यांची गय करू नका, प्रसंगी पोलिसांचा वापर करून प्रकल्प राबवा, असं वक्तव्य केलं होतं. हा पंढरीनाथ गुंडगिरी करणारा आंबेरकर नारायण राणे किंवा निलेश राणेंबरोबर असतो. त्यांच्या चिथावणीमुळे वारीशेसारख्या पत्रकाराची हत्या करण्याचं षडयंत्र आंबेकरने आखलं,” असा गंभीर आरोप विनायक राऊतांनी नारायण राणेंवर केला आहे.

“वारिशेंची हत्या घडवून आणली, फडणवीसांनी उत्तर दिलं पाहिजे”- Vinayak Raut

“पंढरीनाथ आंबेरकर हा सराईत गुंड आहे. त्याने यापूर्वी असे अनेक प्रयत्न केले आहेत. 2020 साली कुंभवडेला मनोज महेकर या तरुणाच्या अंगावरही गाडी घालत ठार करण्याचा प्रयत्न केला होता. कारण, त्याचे वडील रिफायनरी विरोधी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आहेत. पंढरीनाथ आंबेरकर हा रिफायनरीच्या पैशांवर पोसणारा गुंड आहे. त्यामुळे त्यांच्यासारख्यांचा कायमस्वरून बंदोबस्त करण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची आहे. वारिशेंची हत्या घडवून आणली असून, याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे,” असे विनायक राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Back to top button