‘काही लोक पुनर्विचार याचिकेबाबत ट्विटर वरून माहिती देतायत, हे काय गौडबंगाल ?’

sambhajiraje vs vinayak mete

मुंबई : राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.

मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन पुकारले आहे. संभाजीराजे यांनी राज्य सरकारकडे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची मागणी केली होती. अखेर राज्य सरकारकडून याचिका दाखल करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाबाबत आम्ही शासनाकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्याची प्रमुख मागणी केली होती. ती मान्य करण्यात आली असून, आज सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनातर्फे ही याचिका दाखल करण्यात आली. माझ्या मागणीनुसार या याचिकेमध्ये गायकवाड आयोगाच्या अहवालातील उर्वरीत ऍनेकजर्स देखील भाषांतरीत करण्यात येतील, असे नमूद केले आहे, अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली.

दरम्यान, संभाजीराजे यांच्या या माहितीवर शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी संभाजीराजे यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘पुनर्विचार याचिका दाखल केलीय का? याबाबत सरकारकडून कोणीही बोलत नाही. फक्त काही लोक ट्विटरवरून माहिती देत आहेत. हे काय गौडबंगाल आहे,’ असा सवाल मेटे यांनी उपस्थित केलाय. यासोबतच, ‘सरकारने उशिरा का होईना पुनर्विचार याचिका दाखल केली असेल तर त्याचं स्वागत आहे. पण पुनर्विचार याचिका करण्यासाठी एक महिना का घेतला? आधीच ही याचिका दाखल केली असती तर चांगलं झालं असतं,’ अशी प्रतिक्रिया विनायक मेटे यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे.

महत्वाच्या बातम्या