बीड भाजपवर नाराज असणारे मेटे गडकरींच्या प्रचारासाठी नागपुरात

टीम महाराष्ट्र देशा : बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांवर सतत अन्याय होत असल्याचा आरोप शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी एका बैठकीत केला होता. त्यामुळे शिवसंग्राम राज्यात भाजपसोबत काम करेल, मात्र बीड जिल्ह्यात काम करणार नाही, असा निर्णय शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी घेतला होता. त्यामुळे मेटे भाजपवर नाराज असल्याच बोललं जात होत.

मात्र, नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष तथा शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसंग्रामच्या जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मेटे हे बीड मध्ये नाराज असले तरी राज्यात भाजप सोबतच असल्याचे स्पष्ट झाले आहे. विनायक मेटे यांचे नागपुरात मोठे वलय आहे त्यांच्या आवाक्यात नागपुरात बरच मतदान असल्याने गडकरी यांनी आवर्जून मेटे यांना पाचारण केल्याची चर्चा आहे. आज संध्याकाळी नागपूरचा सक्करदरा चौकात हा मेळावा होणार आहे

नितीन गडकरी यांच्या विजयासाठी प्रचाराची रूपरेषा यावर शिवसंग्रामच्या कार्यक्रमाचा आराखडा निश्चित करण्यात येणार आहे. या जाहीर मेळाव्यामध्ये केंद्रीय मंत्री नितिन गडकरी स्वतः उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नागपूरचे पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील उपस्थित असणार आहेत.