लिंगायत महामोर्चात विनय कोरे सहभागी होणार

vinay kore

सांगली : लिंगायत समाजाच्या धर्म मान्यतेसह अन्य विविध मागण्यांसाठी लिंगायत समाजाच्यावतीने रविवार ३ डिसेंबर रोजी आयोजित महामोर्चा न भूतो न भविष्यती निघण्यासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाणार असून लिंगायत महामोर्चात जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक माजी मंत्री विनय कोरे स्वतः सहभागी होतील, अशी ग्वाही जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी आज शुक्रवारी दिली.

लिंगायत समाजाच्यावतीने विविध मागण्यांसाठी आयोजित लिंगायत महामोर्चास जनसुराज्य शक्ती पक्षाच्यावतीने समित कदम यांनी जाहीर पाठिंबा दिला. त्यावेळी सांगली जिल्हा लिंगायत बोर्डिंग येथील सांगली जिल्हा संपर्क कार्यालयात आयोजित जनसुराज्य शक्ती पक्ष व लिंगायत समाजबांधवांच्या बैठकीत समित कदम बोलत होते. लिंगायत बांधवांच्या या रास्त मागण्यांबाबत जनसुराज्य शक्ती पक्षानेही खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे. तसा आदेशही विनय कोरे यांनी आपल्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला आहे. सांगली येथील लिंगायत महामोर्चा न भूतो न भविष्यती करण्यासाठी विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातही जय्यत तयारी केलेली आहे. व्यापारी व कष्टकरी असलेला लिंगायत समाज प्रथमच आपल्या न्याय मागण्यांसाठी रस्त्यावर उतरत आहे. या समाजाच्या मागण्या रास्त आहेत. मराठा क्रांती मोर्चानंतर सांगली येथे होणारा हा महामोर्चा ऐतिहासिक करण्यासाठी सर्वच लिंगायत समाजबांधव प्रयत्नशील आहेत. हा महामोर्चा केंद्र व राज्य शासनाला जाग आणणारा ठरणार आहे. मराठा क्रांती मोर्चाचा अनुभव लक्षात घेऊन हा महामोर्चाही यशस्वी करणार आहे. त्यासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाची पश्चिम महाराष्ट्रातील संपूर्ण ताकद उभी करणार असून या महामोर्चात स्वतः विनय कोरे सहभागी होणार असल्याचेही समित कदम यांनी सांगितले.