ग्रामस्थांची वज्रमुठ: चार नक्षल स्मारके केली उध्वस्थ

नक्षलवाद्यांना खुलं आव्हान देत गुढीपाडव्याच्या दिवशी उभारली निर्भयतेची गुढी

टीम महाराष्ट्र देशा- नक्षलवाद्यांच्या अन्याय आणि अत्याचाराचा सामना करणाऱ्या गडचिरोलीमध्ये क्रांतिकारी आणि अभूतपूर्व अशी घटना पहायला मिळाली आहे. ज्या गडचीरोलीला नक्षल्यांचा गड समजलं जायचं आज त्याच गडचिरोलीमध्ये ग्रामस्थांच्या एकीच्या वज्रमुठीने नक्षलवाद हद्दपार होताना दिसत आहे. गडचिरोलीमध्ये ग्रामस्थांनी एकी करत गुढीपाडव्याला नेलगुंडा, मीडदापली, गोंगवाडा, पेनगुंडा या चार गावातील २०० ते २५० ग्रामस्थांनी एकत्र येत चार नक्षल स्मारके उध्वस्त केली व नक्षलवाद्यांना कुठल्याही प्रकारची मदत करायची नाही, अशी शपथ घेतली तसेच नक्षलवाद्यांची स्मारके उध्वस्त करून यापुढे नक्षलवादाला इकडे थारा मिळणार नाही असा संदेश दिला आहे.

बंदुकीच्या जोरावर आजपर्यंत नक्षल्यांनी दुर्गम भागातील नागरिकांचा त्यांना पाहिजे तसा वापर करून घेतला. मात्र आता प्रगती करायची असेल तर नक्षलवाद नष्ट होणे आवश्यक आहे. ही बाब गावकऱ्यांना समजली आहे. भामरागड तालुक्यातील नेलगुंडा, मिडदापल्ली, गोंगवाडा, पेनगुंडा या गावातील नागरिकांनी आठ दिवसांपूर्वी ग्रामसभा घेतली. या ग्रामसभेत गावाच्या हद्दित असलेले नक्षल स्मारक तोडण्याचा निर्णय घेतला. गुढीपाडव्याची तारीख यासाठी ठरविण्यात आली.नियोजनाप्रमाणे गावकऱ्यांनी एकत्र येत गुढीपाडव्याच्या दिवशी नक्षल स्मारक उद्ध्वस्त केले. नक्षल स्मारक उद्ध्वस्त केल्यानंतर यापुढे नक्षल्यांना कोणत्याही प्रकारची मदत दिली जाणार नाही, अशी शपथ घेतली.बांधकामाच्या वेळीही गावकऱ्यांनी स्मारकांना विरोध केला होता हे येथे उल्लेखनीय. शाश्वत विकास करायचा असेल तर यापुढे आपण नक्षलवाद्यांना मदत करता कामा नये, अशी भावना येथे एकत्र आलेल्या २०० ते २५० आदिवासी ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान या चार गावातून सुरू झालेली ही नक्षली स्मारक उध्वस्त करण्याची मोहीम येत्या काळात एटापल्ली, सिरोंचा, अहेरी, कोरची व धानोरा या नक्षलवादांच्य दृष्टीने सर्वाधिक संवेदनशील असलेल्या तालुक्यातील गावांमध्ये सुध्दा बघायला मिळाली तर आश्चर्य वाटायला नको. विशेष म्हणजे यावेळी गावकऱ्यांच्या मनात नक्षलवाद्यांप्रती मोठा असंतोष दिसून आला. हाच असंतोष नक्षलवाद्यांची अतिदुर्गम भागातील नाळ तोडण्यात कामी येत आहे.
विशेष म्हणजे, नेलगुंडा, मिडदापल्ली, गोंगवाडा, पेनगुंडा ही गावे नक्षल्यांचा गड मानली जात होती. मात्र याच गावातील नागरिकांनी एकत्र येत नक्षल स्मारक तोडण्याच्या माध्यमातून नक्षल चळवळीलाच खुले आव्हान दिले आहे. एकाच दिवशी चार नक्षल स्मारके खुलेआम तोडल्याची घटना गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे. यामुळे नक्षल चळवळीला फार मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे.

You might also like
Comments
Loading...