fbpx

बीसीसीआयकडून संघ व्यवस्थापनात बदल, ‘हा’ माजी खेळाडू बनला फलंदाजी प्रशिक्षक

टीम महाराष्ट्र देशा : २०१९ चा वर्ल्ड कप संपल्यानंतर बीसीसीआय सध्या संघात आणि संघव्यवस्थापनामध्ये बदल करत आहे. त्यासाठी बीसीसीआयने महत्वाच्या पदांसाठी अर्ज मागवले होते. त्यात मुख्य प्रशिक्षकांसह फलंदाजी, गोलंदाजी आणि इतरही अनेक पदांसाठी अनेक अर्ज आले होते.

त्यात बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक पदी रवी शास्त्री यांची फेरनिवड केली आहे. तसेच फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांची उचलबांगडी करत त्यांच्या जागी विक्रम राठोड यांची निवड केली आहे तर भरत अरुण आणि आर श्रीधर अनुक्रमे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असतील. त्यांची या पदांवर फेरनिवड करण्यात आली आहे.

दरम्यान, विक्रम राठोड हे भारताकडून १९९६ मध्ये ६ कसोटी सामने आणि ७ वन डे सामने खेळले आहेत. तसेच रणजी क्रिकेटमध्ये त्यांनी पंजाबकडून चांगली कामगिरी केली होती. त्याचबरोबर त्यांना प्रशिक्षक पदाचा अनुभवही आहे. त्यामुळेच त्यांची या पदावर निवड करण्यात आली आहे.

फलंदाजी प्रशिक्षक पदाच्या रेसमध्ये संजय बांगर, विक्रम राठोड, मार्क रामप्रकाश यांच्यात चुरस होती. परंतु या तिघांमधून विक्रम राठोड यांनी बाजी मारली आहे. तसेच इतर पदांमध्ये नितीन पटेल यांची फिजिओ म्हणून निवड झाली आहे.