कर्जमाफी योजनेची मुदत ३० जून पर्यंत वाढवावी, विखे पाटलांची मुख्यमंत्र्यांना पत्रातून मागणी

अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाभावामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक गोष्टीच्या खरेदीव्यतिरिक कोणालाही घराबाहेर पडण्याची मुभा नाही. अशातच दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेची, तसेच पंजाबराव देशमुख व्याजमाफी योजनेची मुदत 30 जूनपर्यंत वाढवावी, अशी मागणी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

याबाबत विखे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, या योजनेच्या लाभाबाबत शेतकऱ्यांसमोर असलेल्या अडचणींकडे लक्ष वेधत, तातडीने निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे. कर्जमाफी योजनेची मुदत 30 मार्च 2020पर्यंत होती. या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून शेतकऱ्यांनी आवश्यक असणारी सर्व प्रक्रिया सुरू केली; मात्र कोरोनाच्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यातच उत्पादित माल बाजारात विक्रीसाठी आणणेही शक्य होणार नाही.

अशातच अवकाळी पपाऊस आणि गारपिटीने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कर्ज खात्यात भरावयाची रक्कम जमविणेही शेतकऱ्यांसाठी अवघड झाले असल्याचे विखे पाटील यांनी पत्रातून मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. यामुळे या सर्व कर्जमाफी योजनेस 30 जून 2020पर्यंत मुदतवाढ दिली जावी अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे.