मुन्ना यादव एका फॉर्म हाऊसमध्ये लपलाय- विखे पाटलांचा गौप्यस्फोट

नागपूर : हत्येच्या प्रयत्नासारखा गंभीर आरोप असलेला मुन्न यादव नागपूर शहरापासून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका फॉर्म हाऊसमध्ये लपून असल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज, शुक्रवारी विधानसभेत केला. हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावादरम्यान कायदा-सुव्यवस्थेच्या विषयावर ते बोलत होते.

याबाबत विखे-पाटील म्हणाले की, नागपूर पोलीस रात्रं-दिवस मुन्ना यादवचा शोध घेत आहेत. तसेच तो पोलिसांना सापडत नसल्याचे सांगितले जाते. परंतु, हा मुन्ना यादव नागपूरपासून 22 किलोमीटर अंतरावरील एका फार्महाऊसमध्ये दडून बसला आहे. मुन्ना यादव नेमका कुठे आहे, याची माहिती सभागृहात जाहीर झाल्यामुळे पोलिस तिथे पोहचेपर्यंत तो फरार झालेला असेल. त्यामुळे पोलिसांनी आता नागपुरातील भाजपचे नगरसेवक विक्की कुकरेजा यांची सखोल चौकशी करावी. मागील आठवडाभरातील त्यांचे मोबाईल लोकेशन आणि कॉल रेकॉर्ड्स तपासावे. पोलिसांना मुन्ना यादवचे धागेदोरे मिळतील, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

मुन्ना यादवविरूद्ध कारवाई करण्याबाबत सरकारची भूमिका प्रामाणिक असेल तर मुख्यमंत्र्यांनी सर्वप्रथम त्याला इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षपदावरून बडतर्फ करावे, अशीही मागणी त्यांनी केली. या सरकारने राजकीय फायद्यासाठी गुंडांना पाठीशी घालण्याचे धोरण स्वीकारल्यामुळे समाजात ‘मुन्ना यादव’ निर्माण होऊ लागले आहे. नागपूर पोलिसांना मुन्ना यादव सापडत नसेल तर त्यांनी त्याला फरार घोषित करावे. त्याला पकडण्यासाठी 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करावे. बक्षीसाची रक्कम द्यायला आपण तयार असल्याचे विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

Comments
Loading...