भारतीय राजकारणातील एक तत्ववादी पर्व संपले : विखे पाटील

मुंबई : माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे भारतीय राजकारणातील एक तत्ववादी पर्व संपले असून, त्यांच्या रूपात एक समर्पित, संवेदनशील आणि खंबीर नेतृत्व हरपल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

वाजपेयी यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना ते म्हणाले की, कवि मनाचे वाजपेयी संवेदनशील तर होतेच. पण ते तेवढेच कणखरही होते. देशहित हेच त्यांचे पहिले प्राधान्य होते. पंतप्रधान म्हणून त्यांनी देशासाठी भरीव योगदान दिलं. १९९१ मध्ये भारताने उदारीकरणाचे धोरण स्वीकारले आणि वाजपेयींच्या काळात त्याला गती देण्यात आली. पंतप्रधान म्हणून त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले.

त्या काळात आमचे वडील बाळासाहेब विखे पाटील यांनी संत तुकाराम महाराजांची प्रतीमा असलेले नाणे काढण्याची मागणी केली होती आणि त्या मागणीला अटलबिहारी वाजपेयी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसा निर्णय घेऊन त्यावर तातडीने अंमलबजावणी करण्यात आली व नवी दिल्लीतील एका सोहळ्यात थाटामाटात संत तुकाराम महाराजांची प्रतीमा असलेल्या नाण्याचे अनावरण झाले, अशी आठवणही विखे पाटील यांनी विषद केली.

एक उत्तम वक्ते म्हणून देखील अटलबिहारी वाजपेयींचे नेहमीच स्मरण केले जाईल. त्यांचे अनेक भाषण,कविता आपण ऐकल्या आहेत. अतिशय परखड आणि नेमक्या शब्दांत व्यक्त होण्याची विलक्षण शैली त्यांच्याकडे होती. त्यांच्या देहबोलीतून आणि शब्दांतून त्यांचा बाणेदारपणा प्रकट होत असे. त्यांच्या निधनामुळे भारताची मोठी हानी झाली असून, भारताच्या संसदीय लोकशाहीच्या इतिहासात त्यांचे नाव अजरामर राहिल, या शब्दांत राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

चालता-बोलता विश्वकोष काळाच्या पडद्याआड गेला : सुप्रिया सुळे