नजरकैदेत संजय निरूपमांना नव्हे तर उद्धव ठाकरेंना ठेवायला हवे होते : विखे पाटील

टीम महाराष्ट्र देशा- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावेळी मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. कॉंग्रेसच्या नेत्यांनी निरुपम यांना नजरकैदेत ठेवले असल्याचा आरोप केला होता याच मुद्य्यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सेना भाजपवर निशाना साधला आहे. नजरकैदेत संजय निरूपमांना नव्हे तर उद्धव ठाकरेंना ठेवायला हवे होते असं म्हणत विखे-पाटील यांनी सेना भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

नेमकं काय म्हणाले विखे-पाटील 

मागील चार वर्ष विरोधी पक्षांनी संपूर्ण देशात भाजप व शिवसेना सरकारविरूद्ध रान पेटवले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना धडकी भरली असून, चार वर्ष एकमेकांवर प्रचंड टीका केल्यानंतर एकत्र येण्यासाठी केविलवाणी धडपड करतात, हा विरोधी पक्षांचा मोठा विजय आहे. सरकारच्या मनात विरोधी पक्षांबद्दल धास्ती असल्यामुळेच अमित शहांच्या दौऱ्यात काँग्रेसने आंदोलन करू नये म्हणून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांना सकाळपासून नजरकैदेत ठेवण्यात आले. पण खरे तर राज्य सरकारने निरूपम यांच्याऐवजी उद्धव ठाकरेंना नजरकैदेत ठेवायला हवे होते. कारण संजय निरूपम यांनी फार तर अमित शहांसमोर निदर्शने केली असती. शिवसेनेसारखे 4 वर्ष सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसल्यानंतरही वेळोवेळी पाठीत खंजीर खुपसला नसता. भाजपला पाठीमागून वार करण्याचा खरा धोका शिवसेनेकडून असल्याने सरकारने निरूपमांना नव्हे तर उद्धव ठाकरेंना नजरकैद करायला हवे होते. पण त्याऐवजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मातोश्रीवर नजराणा पेश करायला गेले, असा घणाघात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

2 Comments

Click here to post a comment
Loading...