हर्षवर्धन पाटील – मोहिते पाटलांची गुप्त बैठक, माढ्यासह बारामती मतदारसंघात चर्चेला उधान

इंदापूर: रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतर खा विजयसिंह मोहिते पाटील यांनी भेटीगाठीवर भर दिला आहे, आज मोहिते पाटील यांनी इंदापूरचे माजी आमदार कॉंग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांची सकाळी भेट घेतली आहे. या भेटीने माढा तसेच बारामती लोकसभा मतदारसंघात राजकीय चर्चेला उधान आले आहे.

विजयसिंह मोहिते यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेतल्यानंतर पवारांकडून दुखावलेल्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. मागील आठवड्यात अनेक वर्षांचे हाडवैर विसरत त्यांनी पंढरपूरच्या सुधाकरपंत परिचारक यांची भेट घेतली, तसेच सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांना भेटून चर्चा केली होती. दरम्यान, आज हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीला विशेष महत्वप्राप्त झाले असून, दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे गुलदस्त्यातच आहे.

मोहिते पाटील यांच्याप्रमाणे हर्षवर्धन पाटील हे देखील राष्ट्रवादीवर नाराज आहेत, २०१४ साली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून झालेला पराभव ते आजही विसरू शकलेले नाहीत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस – राष्ट्रावादीची आघाडी झाली आहे, तरी देखील इंदापूरची जागा कोणाकडे असेल हे निश्चित झालेले नाही, त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पहायला मिळत आहे.

हर्षवर्धन पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवारांसह खुद्ध  शरद पवार यांनी देखील त्यांची भेट घेतली होती. दरम्यान, आज विजयसिंह मोहिते पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धातास बैठक सुरु होती.