विजयकुमार देशमुख आजवरचे सर्वात निष्क्रिय पालकमंत्री – दीपक साळुंखे

deepak salunke & vijaykumar deshmukh

सोलापूर: एक-एक वर्ष नियोजन समितीची बैठक नाही. जिल्ह्यातील विकासकामे निधी मिळत नसल्याने रखडलीत. ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत. ग्रामीण रुग्णालयास विविध विभागांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. यामुळे विकासकामे राबवण्यावर परिणाम झाला आहे. या सर्व गोष्टींस पालकमंत्री विजयकुमार देशमुख जबाबदार असून ते आजवरचे पालकमंत्री सर्वाधिक निष्क्रिय आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी केली आहे.

शासकीय विश्रामगृहावर झालेल्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. गेली तीन वर्षे केंद्र राज्यात भाजपची सत्ता आहे. आम्ही तीन वर्षे बदल होण्याची वाट पाहत होतो. मात्र कोणत्याच पातळीवर सरकार यशस्वी नाही. जनतेच्या प्रश्नांबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरणार आहे. यासाठी आज सर्व तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. नोटाबंदी, कर्जमाफी असो वा शेतकऱ्यांना मदत यावर सरकार फक्त घोषणा करीत आहे. प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जात नाही. सर्वसामान्य जनतेला याचा त्रास होत होत असल्याच सांगत साळुंके यांनी भाजप सरकारवर चांगलाच हल्ला चढवला आहे.

सरकारचे गेल्या तीन वर्षांतील अपयश जनतेसमोर आणण्यासाठी आता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरेल. जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद आहे. कार्यकर्ते आजही सक्रिय आहेत. त्यांना फक्त मदत करून पुढे आणण्यासाठी आता तालुकानिहाय आढावा घेण्यात येत असल्याचे साळुंखे यांनी स्पष्ट केले. मात्र शहर पदाधिकाऱ्यांबद्दल विचारले असता ते म्हणाले, मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. यामुळे मला फक्त ग्रामीणचे विचारा. मला शहराबाबत काहीच माहिती नसल्याचे स्पष्ट केले