fbpx

देवेंद्र फडणवीस पहिले मराठी पंतप्रधान बनतील, ‘या’ नेत्याने केली भविष्यवाणी

devendra-fadanvis

टीम महाराष्ट्र देशा: देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने महाराष्ट्राला धुरंदर आणि कार्यक्षम नेतृत्व मिळाले आहे, महाराष्ट्राचा पंतप्रधान बनवा हे मराठी जनतेचे स्वप्न आहे, येत्या काळामध्ये फडणवीस पहिले मराठी पंतप्रधान बनतील, असा विश्वास जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात आयोजित सभेत ते बोलत होते.

फडणवीस यांच्या रूपाने महाराष्ट्राला कार्यक्षम नेतृत्व मिळाले आहे, त्यामुळे आता महाराष्ट्राचे वजन दिल्लीत वाढवण्यासाठी राज्यातील सर्व ४८ जागा जिंकणे गरजेच असल्याचं मत शिवतारे यांनी व्यक्त केले आहे, यावेळी बोलताना त्यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर देखील तोफ डागली आहे.

कांचन कुल यांनी मोठे आव्हान उभे केल्याने खुद्द पवार साहेब आणि अजित पवारांना गल्लीगल्लीत फिरावं लागत आहे. १९९१ सालापर्यंत मोटर सायकलवर दुध घालणाऱ्या अजित पवारांना लोकसभेसाठी मत देण्याचं आवाहन पवार साहेबांनी केल, पण त्यांच्या रूपाने नकळत आम्ही महाभ्रष्ट्राचारी नेत्याला जन्माला घातले, आता हे चित्र बदलण्याची संधी आली आहे, दोनवेळा सुप्रिया सुळे यांना भरभरून मते दिली, पण बारामती मतदारसंघासाठी त्यांनी काय केल हा प्रश्न आहे. असा घणाघात विजय शिवतारे यांनी केला आहे.

कांचन कुल नवख्या असल्याचा प्रचार केला जात आहे. सुळे यांना संसदरत्न पुरस्कार मिळाल्याच सांगतात, पण त्या मतदारसंघात विकास करण्यात अपयशी ठरल्या आहेत. गोठ्यावरचा विजय शिवतारे मंत्री होतो, त्यामुळे अजित पवारांना माझ्यासमोर बसाव लागत, हे पवारांच्या पोट दुखण्याच कारण आहे, अशी टीका शिवतारे यांनी केली.