fbpx

सुप्रिया सुळे यांचा निवडणुकीत पराभव केला की कायमची कीड निघून जाईल : विजय शिवतारे

टीम महाराष्ट्र देशा : निवडणुकांच्या तारखा जश्या जवळ येवू लागल्या आहेत तश्या प्रचारांच्या फेऱ्या देखील उमेदवारांकडून वाढवण्यात आल्या आहेत. बारामती लोकसभा मतदार संघामध्ये देखील आघाडी आणि युती कडून जोरदार प्रचार सुरु आहे. रविवारी खडकवासला विधान सभा मतदार संघात भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांनी प्रचार सभा घेतली यावेळी राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर चांगलीच टोलेबाजी केली.

यावेळी विजय शिवतारे म्हणाले की, ही निवडणूक कांचन कुल विरुद्ध सुप्रिया सुळे एवढीच मर्यादित नसून गेली ७० वर्ष चालत आलेली पवार कुटुंबियांची परंपरा मोडीत काढायची आहे. त्यासाठी आता सगळ्यांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे. एकदा का यावेळी सुप्रिया सुळे यांचा निवडणुकीत पराभव केला की कायमची कीड निघून जाईल असा घणाघात देखील यावेळी शिवतारे यांनी केला.

एकेकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना वाटायचं की आम्हीचं राज्यकर्ते आहोत, बाकी सगळे ऐरेगैरे आहेत. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता सर्वसामान्य मंत्री झाले आहेत आणि या राज्यकर्त्यांना आमच्यासमोर बसावं लागत आहे आणि हेच त्यांच मूळ दुखण आहे. असा टोला शिवतारेंनी अजित पवार यांना लगावला.

पुढे शिवतारे म्हणाले की, गेली ४० वर्ष शरद पवार भावी पंतप्रधान म्हणून मिरवत आहेत. मात्र अद्याप त्यांना पंतप्रधान होता आले नाही. पण एका सर्वसामान्य घरातून आलेला नेता जेव्हा गुजरातचा विकास करतो आणि ते गुजरात मॉडेल देशा समोर ठेवतो त्यामुळे देशाला देखील वाटत की, हा नेता जर पंतप्रधान झाला तर निश्चीतच देशाचा विकास होईल आणि त्यामुळेचं नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. परंतु अद्याप पवार यांना पंतप्रधान होता आले नाही.

यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील समुदायाला संबोधित केले. बारामती लोकसभा मतदारसंघातील विजयासाठी इंदापूर आणि भोरमध्ये अदृश्य शक्ती काम करत असून पुरंदर, खडकवासला आणि दौंडमध्ये भाजपला चांगले समर्थन मिळत आहे. तर इंदापूर आणि भोरमध्ये अदृश्य शक्ती भाजपसाठी काम करत आहेत. मात्र, बारामतीमध्ये अजून काम करावे लागणार आहे. त्यामुळे मी स्वतः शेवटचे ३ दिवस बारामतीमध्ये तळ ठोकणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी आपली आगामी रणनीती स्पष्ट केली. चांगला दिवस पाहून पाच हजार कार्येकर्ते घेऊन बारामती मतदार संघात प्रचारात उतरणार. बारामती मतदार संघातील निवडणुक ही सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन कुल मध्ये नसून ही निवडणूक देश तोडणारे आणि देश जोडणारे यांच्यामध्ये आहे असं म्हणत आघाडीवर तोफ डागली.