१९९१ ला अजित पवार यांना निवडून आणून आम्ही एका भ्रष्टाचारी नेत्याला जन्म दिला : विजय शिवतारे

टीम महाराष्ट्र देशा : येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांनी खडकवासला येथे प्रचार सभा घेतली. यावेळी राज्याचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर चांगलीच टोलेबाजी केली. १९९१ ला आम्ही अजित पवार यांना निवडून आणले आणि एका भ्रष्टाचारी नेत्याला जन्म दिला असा घणाघात विजय शिवतारे यांनी यावेळी केला.

यावेळी शिवतारे म्हणाले की, १९९१ ला दुध विकणारे अजित पवार यांना विजयी करा अशी गळ खुद्द पवार साहेबांनी घातली होती. त्यांनतर आम्ही अजित पवार यांना निवडून आणले आणि तेव्हाच आम्ही एका भ्रष्टाचारी नेत्याला जन्म दिला. पुढे शिवतारे म्हणाले की, शरद पवार साहेबांबद्दल मला आदर आहे. पण जेव्हा प्रश्न देशाचा येतो तेव्हा आधी देश त्यानंतर पक्ष आणि पक्ष नेते. त्यामुळे आता बारामती मतदार संघात ७० वर्ष चालत आलेली परंपरा मोडायची आहे.

तसेच विजय शिवतारे म्हणाले की, ही निवडणूक कांचन कुल विरुद्ध सुप्रिया सुळे एवढीच मर्यादित नसून गेली ७० वर्ष चालत आलेली पवार कुटुंबियांची परंपरा मोडीत काढायची आहे. त्यासाठी आता सगळ्यांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे. एकदा का यावेळी सुप्रिया सुळे यांचा निवडणुकीत पराभव केला की कायमची कीड निघून जाईल असा घणाघात देखील यावेळी शिवतारे यांनी केला.

Loading...

दरम्यान, यावेळी व्यासपीठावर महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपच्या उमेदवार कांचन कुल, भीमराव तपकीर, राहुल कुल , विजय शिवतारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील समुदायाला संबोधित केले. बारामती लोकसभा मतदारसंघातील विजयासाठी इंदापूर आणि भोरमध्ये अदृश्य शक्ती काम करत असून पुरंदर, खडकवासला आणि दौंडमध्ये भाजपला चांगले समर्थन मिळत आहे. तर इंदापूर आणि भोरमध्ये अदृश्य शक्ती भाजपसाठी काम करत आहेत. मात्र, बारामतीमध्ये अजून काम करावे लागणार आहे. त्यामुळे मी स्वतः शेवटचे ३ दिवस बारामतीमध्ये तळ ठोकणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी आपली आगामी रणनीती स्पष्ट केली. चांगला दिवस पाहून पाच हजार कार्येकर्ते घेऊन बारामती मतदार संघात प्रचारात उतरणार. बारामती मतदार संघातील निवडणुक ही सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन कुल मध्ये नसून ही निवडणूक देश तोडणारे आणि देश जोडणारे यांच्यामध्ये आहे असं म्हणत आघाडीवर तोफ डागली.