विधानसभेसाठी पुरंदरमधून विजय शिवतारे यांना संजय जगताप देणार का टक्कर ?

अनिकेत निंबाळकर / पुरंदर  : राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच वारं आता शांत होत असतानाच तालुक्यातील पुढाऱ्यांना विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच काही आमदारांनी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरु केली आहे.

पुरंदर विधानसभा मतदारसंघात देखील असेच काहीसे चित्र दिसून येत आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार आणि राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरवात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळीच केल्याच दिसत आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस नेते संजय जगताप यांनी देखील विजय शिवतारे यांना टक्कर देण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यामुळे यंदा पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्यात रंगतदार लढत होणार असल्याच दिसत आहे.

गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी कॉंग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांच्यावर दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे हा विजयरथ असाच पुढे चालावा यासाठी विजय शिवतारे प्रयत्नशील असतील त्यासाठी त्यांनी मतदारसंघात विकासकामांचा धडाका लावला आहे. तसेच गुंजवणी धरण प्रकल्प , पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ या मोठ्या प्रकल्पांच्या मंजुरी मिळवण्यात देखील त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे पुरंदरचे बहुतांशी मतदार हे शिवसेनेकडे असल्याचे दिसत आहे.

तर दुसरीकडे संजय जगताप यांनी देखील जनसामान्यांची गरज ओळखून विकासकामांचा दणका लावला आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांबरोबर सल्ला मसलत करून विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली आहे. या दोन उमेदवारां व्यतिरिक्त पुरंदरमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून संभाजी झेंडे हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र तरी देखील संजय जगताप यांचे मतदारसंघातील राजकीय वजन पाहता आघाडी कडून पुरंदरची उमेदवारी ही संजय जगताप यांच्याचं पदरात पडणार असल्याच दिसत आहे.