विजय रुपाणी यांची पुन्हा एकदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी विजय रुपाणी यांच्या नावाची घोषणा केली आणि चर्चांना विराम दिला

गांधीनगर :भारतीय जनता पार्टीने गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विजय रुपाणी यांचीच पुन्हा नियुक्ती केली आहे.  पक्षाच्या बैठकीत विचारमंथन झाल्यानंतर पुन्हा एकदा विजय रुपाणी यांची गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून, तर उपमुख्यमंत्री म्हणून नितीन पटेल यांची वर्णी लागली आहे. गांधीनगर येथील पक्षाच्या कार्यालयात याबाबत निर्णय झाला.गुजरातचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत उलटसुलट चर्चा होत होत्या, परंतु केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी विजय रुपाणी यांच्या नावाची घोषणा केली आणि चर्चांना विराम दिला.

 गुजरात निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, याबाबत मोठी चर्चा सुरु होती. अखेर पुन्हा एकदा विजय रुपाणी यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या अगोदरच्या कार्यकाळातही मुख्यमंत्री विजय रुपाणीच होते, आता पुन्हा एकदा त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.गुजरातमध्ये भाजपला 99, काँग्रेस 77, राष्ट्रवादी काँग्रेस 1, अपक्ष 3 आणि इतर पक्षांनी 2 जागा मिळवल्या.गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला, मात्र काँग्रेस त्यांचा चांगलाच घाम काढला. गुजरातमध्ये 182 पैकी दीडशे जागा जिंकू असं छातीठोकपणे सांगणाऱ्या, भाजप अध्यक्ष अमित शाह यांना शंभर जागांवरच विजय मिळवता आला.