गुजरातमध्ये पुन्हा ‘विजय’राज

विजय रुपाणी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान

टीम महाराष्ट्र देशा- मंगळवारी विजय रुपाणी यांनी दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदाच्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपची सत्ता असलेल्या अनेक राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनी हजेरी लावली.विजय रुपाणी हे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.विजय रुपाणी यांच्यासह एकूण 20 जणांना राज्यपाल ओ. पी. कोहली यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. विजय रुपाणी मुख्यमंत्री, तर 9 आमदार कॅबिनेट आणि 10 आमदार राज्यमंत्री म्हणून शपथबद्ध झाले.

विजय रुपाणींची राजकीय कारकीर्द

विजय रुपाणी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे निकटवर्ती मानले जातात. स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणूनही गुजरातच्या राजकारणात त्यांची ओळख आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार विजय रुपाणी यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून सार्वजनिक आयुष्यात प्रवेश केला. पुढे ते राजकारणाकडे वळले.राजकोट पश्चिम या मतदारसंघाचं विजय रुपाणी प्रतिनिधित्व करतात.गुजरात प्रदेश भाजपचे ते अध्यक्षही होते. 2006 ते 2012 या काळात ते भाजपकडून राज्यसभेत खासदार होते.

या शपथग्रहण सोहळ्यास कोण कोण होते हजर

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अरूण जेटली, नितीन गडकरी, जे.पी.नड्डा, अनंत कुमार समवेत अनेक नेत्यांनी भाग घेतला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, यूपीचे योगी आदित्यनाथ, छत्तीसगडचे रमन सिंह, राजस्थानच्या वसुंधरा राजे व भाजपशासित इतर राज्यातील मुख्यमंत्री सामील झाले होते. त्याचबरोबर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल, आनंदीबेन पटेल आणि शंकरसिंह वाघेला हेही उपस्थित होते.