पालघरमधील विजय भाजपाचा नसून निवडणूक आयोगाचा- संजय राऊत

sanjay raut and devendra fadnvis

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी पालघर पोटनिवडणूकीचे पराभवाचे खापर ईव्हीएम मशीन आणि मतदान प्रक्रियेतील घोळावर फोडले आहे. त्यामुळे पालघरमधील पराभव शिवसेनेच्या जिव्हारी गेल्याचे दिसते.

संजय राऊत म्हणाले, राज्यासह देशात ज्या-ज्या ठिकाणी विरोधक एकत्र लढले, त्याठिकाणी भाजपाचा पराभव झाला आहे. ही भाजपासाठी धोक्याची घंटा नव्हे तर भाजपाचीच घंटा वाजली आहे.

पालघरमध्ये मतदान संपल्यानंतर 12 तासांच्या आतच निवडणूक आयोगाने मतांची टक्केवारी बदलली. मतदार याद्यांमधून 50 ते 60 हजार मतदारांची नावे गायब झाली. या सगळ्या घटना संशयास्पद आहेत. त्यामुळे पालघरमधील भाजपाचा हा विजय नसून निवडणूक आयोगाचाच विजय आहे.

भाजपा खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये भाजपचे राजेंद्र गावित विजयी झाले आहेत. गावित यांनी शिवसेनेचे उमेदवार तथा चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांचा ४४,५८९ मतांनी पराभव केला आहे.