विजय चौधरींचा महाराष्ट्राला अभिमान : मुख्यमंत्री

नागपूर – महाराष्ट्र केसरी किताब सलग तिसऱ्यांदा पटकावल्याबद्दल विजय चौधरी यांचा अभिनंदन करणारा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) विधानसभेत मांडला.

महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना थेट शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने या आधीच घेतला असून येत्या आठवडाभरात त्यावर निर्णय घेण्यात येईल. चौधरी यांना ऑलिम्पिक स्पर्धेसाठी देखील मदत करण्यात येईल. चौधरी यांचा महाराष्ट्राला अभिमान आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितले. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी विधानसभेत एकमताने महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव संमत करण्यात आला.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुणे येथे संपन्न झाल्या होत्या. त्यामध्ये जळगावचे विजय चौधरी यांनी विजेतेपद पटकावले आहे. चौधरी यांनी सलग तिसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे. यापूर्वी विजय नरसिंह यादव यांनी हा विक्रम केला होता.