वीजवाहिन्यांतील बिघाडामुळे चाकण एमआयडीसी, परिसरात वीजपुरवठा विस्कळीत

पुणे : महापारेषण कंपनीच्या 400 केव्ही व 132 केव्ही अशा दोन वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यामुळे चाकण शहर, परिसर तसेच चाकण एमआयडीसीमध्ये काल मध्यरात्री एक ते अडीच तास वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. दरम्यान महापारेषणच्या दुरुस्ती कामामुळे चाकण एमआयडीसीमधील चार 22 केव्ही वाहिन्यांचा वीजपुरवठा  दिवसभर बंद ठेवावा लागला.

याबाबत माहिती अशी, की बुधवारी (दि. 1) रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास महापारेषणच्या चाकण उपकेंद्रातून जाणाऱ्या 400 केव्ही वीजवाहिनीमध्ये दोन ठिकाणी बिघाड झाला. त्यामुळे चाकण शहर, परिसर, कुरळी गाव तसेच चाकण एमआयडीसीमध्ये पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्यात आला. मात्र भार व्यवस्थापन शक्य न झाल्यामुळे चाकण एमआयडीसीला वीजपुरवठा करणाऱ्या सारा सिटी, कुरुळी आणि खलुंब्रे या 22 केव्ही वीजवाहिन्यांवर नाईलाजाने प्रत्येकी दोन तासांचे भारनियमन करावे लागले.

दरम्यान दुरुस्तीसाठी याच 400 केव्ही वीजवाहिनीच्या मनोऱ्याखाली असलेल्या महावितरणच्या वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे चाकण एमआयडीसीमधील कल्याणी, एमआयडीसी, सारा सिटी व अहमदनगर फोर्जींग या 22 केव्हीच्या चार वीजवाहिन्यांवरील सुमारे 3500 औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा सुद्धा नाईलाजाने आज दिवसभर बंद ठेवावा लागला.

याशिवाय बुधवारी रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास महापारेषण कंपनीची चाकण-चिंचवड या 132 केव्ही वीजवाहिनीत बिघाड झाल्यामुळे महावितरणच्या 33 केव्ही क्षमतेच्या एकूण 7 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी राजगुरुनगर शहर, पाईट व वाडा या गावांसह भोसरी, तळवडे एमआयडीसी परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या 4 वीजवाहिन्यांना 132 केव्ही नारायणगाव वीजवाहिनीद्वारे पर्यायी वीजपुरवठा सुरु करण्यात आला. मात्र भारव्यवस्थापन शक्य न झाल्याने उर्वरित ह्युंदाई, इशा व कल्याणी या 3 वीजवाहिन्यांवर सुमारे 3 तासांचे भारनियमन करावे लागले.तसेच महापारेषणच्या वीजवाहिन्यांतील या बिघाडामुळे ग्राहकांना नाहक त्रास सोसावा लागला व आर्थिक नुकसान सहन करावे लागले.

हजारो बालकांच्या मृत्यूला जबाबदार कोण?- धनंजय मुंडे