मी सप्टेंबरपासून मदत मागतोय, पण सरकारने काहीही केलं नाही- एकनाथ खडसे

सरकार मदत करत नाही, लोकांनी मरायचं का? एकनाथ खडसेंचा सरकारला सवाल

नागपूर: हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी दुष्काळाच्या मुद्द्यावर चर्चा करत असताना एकनाथ खडसे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरत खडेबोल सुनावले आहे. राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करणार आहात का त्याचबरोबर सरकार मदत करत नाहीत तर लोकांनी मरायचं का? असा सवाल यावेळी खडसेंनी सरकारला केला.जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, बोदवड, अमळनेर तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

काय म्हणाले एकनाथ खडसे

“जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, बोदवड, अमळनेर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करा, यासाठी मी यासाठी पहिल्यांदा ४ जुलै रोजी पत्र दिले आहे. तरीही सरकार सांगते तक्रार मिळाली नाही. या तीन तालुक्यात ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी आहे. पाणीटंचाई असल्याने मी सप्टेंबरपासून मदत मागतोय, दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करा अशी विनंती केली, पण सरकारने काहीही केलं नाही. सरकार मदत करत नाही, लोकांनी मरायचं का? केंद्र सरकारने दुष्काळ जाहीर करण्याचे निकष बदलले आहेत, त्या निकषानुसार राज्यातील एकही दुष्काळी गाव बसणार नाही. केंद्र सरकारने तयार केलेले निकष बाजूला ठेवून दुष्काळग्रस्त तालुक्यांना मदत करा.”

खडसेंच्या प्रश्नाला चंदकांत पाटलांचं उत्तर

खडसे बोलतात ते बरोबर आहे. केंद्राचे निकष अधिक कडक आहेत. पण यात एकही गाव बसणार नाही असे नाही, आम्ही गोंदिया जिल्ह्यातील ३ तालुक्यात याच निकषावर दुष्काळ जाहीर केला आहे. पण हे निकष बदलावे यासाठी माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे, याबाबत अधिवेशन संपल्यावर दिल्लीला जाऊ. केंद्राच्या निकषानुसार दुष्काळ जाहीर केला नाही तर केंद्र सरकारची मदत मिळणार नाही. ज्या गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी असेल त्या ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ