हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी ‘वर्षा’वर मोर्चा काढावा – वडेट्टीवार

blank

टीम महाराष्ट्र देशा : पिकविमा कंपन्या विरोधात शिवसेना आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. बुधवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः रस्त्यावर उतरले होते. यावेळी येत्या पंधरा दिवसांत शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम देण्यात यावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे यांनी दिला आहे. दरम्यान, सरकारमध्ये असताना देखील शिवसेना मोर्चा काढत असल्याने विरोधकांनी निशाना साधला आहे.

विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मोर्चा म्हणजे शिवसेनेची नौटंकी असल्याची टीका केली आहे. एका बाजूला सत्ता भोगत असताना दुसरीकडे पीकविम्यासाठी मोर्चा काढणे हा शिवसेनेचा दुटप्पीपणा असून हिंमत असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर मोर्चा काढावा, असा खोचक टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मुहूर्तावर केवळ शेतकऱ्यांच्या मतासाठी मोर्चाचा दिखावा करण्यात आला, मागील साडेचार वर्षे सत्तेत राहून शिवसेनेला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता आले नाहीत, अशी घणाघाती टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.