आमच्याही संपर्कात भाजप शिवसेनेचे काही नेते, लवकरचं नाव घोषित करणार : जयंत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपत दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे पक्षांतर करणाऱ्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र आता राष्ट्रवादीच्या संपर्कात देखील अनेक भाजप सेनेचे नेते असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. नागपुरात शिवस्वराज्य यात्रेवेळी ते बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले की, आमच्या पक्षातून बरेच नेते भाजप आणि शिवसेनेत गेले. दुसरीकडे गेल्या तीन-चार वर्षांपासून भाजपतील काही नेते, कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. आता तेथे न्याय मिळणार नाही, अशी भीती त्यांना वाटत आहे. असेच ‘त्या’ पक्षातील काही नेते आमच्या संपर्कात आहेत. शिवस्वराज्य यात्रे निमित्त जयंत पाटील आणि खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

दरम्यान  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी भाजप सेनेत प्रवेश केला आहे. तर काही नेते अजूनही पक्षांतराच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे या पक्षांतराचा मोठा फटका राष्ट्रवादी पक्षाल बसला आहे. आता तर नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे मातब्बर नेते आणि माजी आ. गणेश नाईक यांनी देखील भाजपात ४८ नगरसेवकांसह प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला हा सगळ्यात मोठा धक्का मानला जात आहे.