मतपत्रिकांद्वारे मतदान हा मुद्दा जुना झाला,विधानसभेचे मतदान इव्हिएम मशीनवरचं होणार

मुंबई : मतपत्रिकांद्वारे मतदान हा मुद्दा जुना झाला असून, आगामी विधानसभा निवडणुकीचं मतदान इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारेच होणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईत ते काल वार्ताहरांशी बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यासह अशोक लवासा आणि सुशील चंद्र या निवडणूक आयुक्तांनी काल महत्त्वाच्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. मतदानाविषयी जनजागृती मोहीमही राबवण्यात येईल, असं अरोरा म्हणाले.

शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वात आयोगाला भेटलेल्या शिष्टमंडळानं उमेदवारांची निवडणूक खर्च मर्यादा ७० लाख रूपयांपर्यंत वाढवण्याची मागणी केली. सध्या प्रत्येक उमेदवाराला निवडणुकीत २८ लाख रुपयांपर्यंत खर्चाची मर्यादा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी, दिवाळीपूर्वी मतदान घेण्याची आयोगाकडे मागणी केली. राज्यात निम्म्याहून अधिक लोक दिवाळीसाठी आपापल्या गावी जातात, त्या काळात निवडणूक घेतल्यास, मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होऊ शकतो, असं मलिक म्हणाले.