विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-राष्ट्रवादीमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला उत !

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाला उत आला आहे. यामध्ये भाजपचे ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे आघाडीवर आहेत. या माध्यमातून वर्चस्वाची लढाई देखील पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने एका दिवसात शिवसेना व भाजपधील दोन स्थानिक नेत्यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारीही देऊन टाकली. तर भाजपने राष्ट्रवादीच्या माजी राज्यमंत्र्याला उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे.

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, लातूर-बीड-उस्मानाबाद, परभणी-हिंगोली, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, नाशिक आणि अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी २१ मे रोजी मतदान होणार आहे. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. राज्यात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सत्ताबदल झाला. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय समिकरणे बदललेली आहेत. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकानंतर पूर्वी चौथ्या-पाचव्या स्थानावर असलेल्या भाजपने स्थानिक संस्थांच्या राजकारणात जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे ही निवडणूक वेगळी आणि रंगतदार ठरणार आहे.

बीड-उस्मानाबाद -लातूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या होवू घातलेल्या निवडणुकीसाठी भाजपाकडून माजी मंत्री सुरेश धस यांचे नाव निश्चित झाले आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या रूपाने भाजप आणि राष्ट्रवादी वादात अतिशय प्रतिष्ठेच्या ठरलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्यामुळे सुरेश धस यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी आष्टीत सुरेश धस यांच्या निवासस्थानी भेट देऊन चर्चा केली होती. त्यानंतर धस यांचा भाजपमध्ये येण्याचा मार्ग मोकळा झाला होता. बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे यांची जादूची कांडी प्रसिद्ध होती. ही कांडी फिरताच काही मंडळी उघडपणे तर काही मंडळी आपापल्या पक्षात राहून भारतीय जनता पक्षाला मदत करत असत. तोच खाक्या आता पंकजाताई मुंडे यांनी सुरेश धस यांच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरविला आहे.  धनंजय मुंडे यांनी सुद्धा पंकजाताई मुंडे यांच्या मानलेल्या भावाला रमेश कराड यांना फोडून ताईना जबर धक्का दिला.

पक्षविरोधी काम केल्याने सुरेश धस यांना राष्ट्रवादीतून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले होते. या कारवाईनंतर सुरेश धस यांनी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय. मी गरिब म्हणून माझ्यावर कारवाई करण्यात आल्याचे ते म्हणाले होते. राष्ट्रवादीत प्रस्थापित मराठे आणि गरीब मराठे हा संघर्ष आहे. माझा बाप कोणी उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार नव्हता म्हणून माझ्यावर करवाई केल्याचे सुरेश धस यांनी तेव्हा म्हटले होते.

बीड जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने सर्वाधिक जागा मिळवून नंबर एक पक्ष ठरल्यानंतर बीडमध्ये राष्ट्रवादीने भाजपचा गड पोखरला होता. मात्र, सुरेश धस गटाने भाजपशी उघड उघड हात मिळवणी करुन राष्ट्रवादीच्या तोंडचा घास काढून घेतला. कमी जागा मिळवलेल्या भाजपने येथे पुन्हा सत्ता स्थापन केली. बीडमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध मंत्री पंकजा मुंडे असा सामना रंगला होता. भाऊ धनंजय यांनी चांगली कामगिरी करत बहीण पंकजा यांना जिल्हा परिषदेत जोरदार धक्का दिला होता. मात्र, पक्ष विरोधी काम करत सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांना मदत करत भाजपला जिल्हा परिषदेत सत्तेत बसविले. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यासह पक्षातील कार्यकर्ते नाराज होते. बीड जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला उघडपणे मदत करणारे सुरेश धस यांना विधानपरिषदेची उमेदवारी देऊन पंकजा मुंडे यांनी उपकाराची परतफेड केली, असं म्हणायला हरकत नाही.

suresh dhas(सुरेश धस यांचा उमेदवारी अर्ज दाखल )

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी सुद्धा बहिणीला धक्का देत एका दिवसात शिवसेना व भाजपधील दोन स्थानिक नेत्यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारीही देऊन टाकली. विधान परिषदेतीली विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत बुधवारी उस्मानाबादमध्ये भाजपचे स्थानिक नेते रमेश कराड यांनी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि दुपारी त्यांनी लातूर-बीड-उस्मानाबाद मतदारसंघातून पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. नाशिक स्थानिक संस्था मतदारसंघातील छगन भुजबळ यांचे समर्थक व विद्यमान आमदार जयंत जाधव यांना डावलून शिवसेनेचे अॅॅड. शिवाजी सहाणे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सहाणे यांनी पक्षात प्रवेश केला आणि लगेच त्यांनी उमेवारी अर्जही दाखल केला. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार जयंत जाधव यांच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार म्हणून सहाणे यांनी निवडणूक लढविली होती. आता राष्ट्रवादीने त्यांनाच उमेदवारी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक रमेश कराड यांना गळाला लावले आहे. रमेश कराड हे पंकजा मुंडे यांच्या अत्यंत जवळच्या वर्तुळातील होते. त्यामुळे पंकजा कराड यांना आपल्या भावासारखं मानायच्या. तब्बल ११ वर्षे ते पंकजांसोबत होते. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याने पंकजा यांच्या गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे या सगळ्यात धनंजय मुंडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे बोलले जाते. पंकजा मुंडे यांचा अपवाद वगळता रमेश कराड यांचे भाजपातील कोणाशीही सलोख्याचे नाते नाही. त्याचमुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी रमेश कराड यांचे मन वळवले आहे, अशी चर्चा बीडमध्ये रंगली आहे.

रमेश कराड हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. पंकजा मुंडे या विधानपरिषदेच्या जागेसाठी रमेश कराड यांना उमेदवारी देण्यासाठी अनुकूल नसल्याचं बोललं जातं. रमेश कराड हे लातूर जिल्हा बँकेची निवडणूक नाणेफेकीत हरले. लातूर ग्रामीण मतदार संघातून दोन वेळा भाजपकडून निवडणूक लढवली, मात्र पदरी पराभवच पडला. रमेश कराड यांचे पंकजा मुंडें व्यतिरिक्त भाजपातील इतर कुणाशी असे संबंध नाहीत, जे त्यांच्या मदतीला धावून येतील. याचाच फायदा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. रमेश कराड यांना उमेदवारी देत धनंजय मुंडे यांनी मोठी खेळी खेळली आहे.