विदर्भाच्या पोट्ट्यांनी रणजीची फायनल मारली बे !…

नागपूर : गतविजेत्या विदर्भाने रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी चौथ्या दिवशी सौराष्ट्राविरुद्धच्या किताबी लढतीत सौराष्ट्रवर 78 धावांनी मात करताना जेतेपद स्वतःकडे राखले.अंतिम सामन्यात पाचव्या दिवशी सौराष्ट्रला दुसऱ्या डावात 127 धावांत गुंडाळून विदर्भाने विजय मिळवला.

पहिल्या डावात अवघ्या 5 धावांची आघाडी घेऊन फलंदाजीला उतरलेल्या विदर्भाने दुसऱ्या डावात 200 धावा केल्या. विदर्भाकडून आदित्य सरवटेने सर्वाधिक 49 धावा केल्या. त्याला गणेश सतिश (35) आणि मोहित काळे (38) यांनी साथ दिली. सौराष्ट्रचा गोलंदाज धर्मेंद्रसिंग जडेजाने 96 धावात 6 गडी बाद केले.

विदर्भने विजयासाठी ठेवलेल्या 206 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सौराष्ट्रचा संपूर्ण संघ 127 धावांवर तंबूत परतला. आदित्य सरवटेने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्याने संघाचा विजय सुकर झाला. अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा दोन्ही डावांत अपयशी ठरला हे देखील सौराष्ट्राच्या पराभवाचे प्रमुख कारण मानले जात आहे .अखेरच्या दिवशी ठराविक अंतराने सौराष्ट्राच्या विकेट्स जात राहिल्याने दारुण पराभव स्वीकारावा लागला.

तत्पूर्वी,विदर्भने पहिल्या डावात ३१२ धावा केल्या होत्या. यात अक्षय कर्णेवारने नाबाद ७३ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरादाखल खेळताना सौराष्ट्राच्या स्नेल पटेलने शतकी खेळी केली. परंतु, इतर फलंदाजांनी साथ न दिल्याने पटेलची शतकी खेळी वाया गेली.