या गावात पहिल्यांदाच आली ‘लालपरी’, गावकऱ्यांनी केलं जंगी स्वागत

blank

टीम महाराष्ट्र देशा : भद्रावती तालुक्यातील माणगाव राळेगाव तोरणा परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना वरोरा येथे जाण्यासाठी बस नव्हती. त्यामुळे मिळेल त्या साधनाने त्यांना शाळेला जावे लागत असे. ही समस्या परिसरातील ग्रामस्थांनी खासदार बाळू धानोरकर यांच्याकडे कथन केली असता खासदार धानोरकर यांनी वरोरा आगाराला निर्देश देऊन वरोरा इथून पाटाळा, राळेगाव, माणगाव तोरणा, शेंबळ परत वरोरा बस सेवा सुरु केली आहे. थोराणा येथील गावकरी मंडळींनी मोठ्या थाटामाटात लालपरिचं स्वागत केले. ही बस पहिल्यांदा गावात आल्याने ग्रामस्थांचा आनंद गगनात मावत नव्हता.

blank

राळेगाव माणगाव तोरणा हा दुर्लक्षित परिसर आहे. या परिसरातील शेकडो विद्यार्थी वरोरा येथे शाळा महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. थेट बससेवा नसल्याने विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असे. एसटी महामंडळाकडे बससेवा सुरू करण्यासाठी अनेकदा या परिसरातील जनतेने निवेदने दिली. मात्र, त्यांच्या या निवेदनाला केराची टोपली दाखवण्यात आली. दरम्यान, नवनिर्वाचित खासदार बाळू धानोरकर यांना ही समस्या सांगितली असता त्यांच्या निर्देशावरून हि बससेवा सुरू झाली या बससेवेचे थोराणा येथे जंगी स्वागत करण्यात आले.