विदर्भ-मराठवाड्याच्या सीमा बंद

परभणी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळता न येण्यासारखा आहे. आज जर याच्याकडे दुर्लक्ष केले तर कदाचित भविष्यात नेमक्या कोणत्या प्रसंगाला आपल्याला सामोरे जावे लागेल याची कल्पना करवत नाही. आरोग्याची सुरक्षितता ही प्रत्येकाच्या हातात असून मास्क, सॅनिटायजर व सुरक्षित अंतर ही त्रिसुत्री कोरोनाच्या तावडीपासून बचावणारी असल्याने याचे काटेकोर पालन नागरिकांनी स्वत:हून करणे अपेक्षित आहे. यात जर कोणी बेफिकरी करत असेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाईसह इतरही निर्बंध घालू या शब्दात जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी जनतेला खडेबोल सुनावत कर्तव्याची जाणीव करुन दिली आहे.

विदर्भातील काही जिल्ह्यात कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता तशी परिस्थिती जिल्ह्यात उद्भवू नये यासाठी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी परभणी शहरातील मुख्य बाजारपेठ व इतर सार्वजनिक ठिकाणी पायी फिरुन दंडात्मक कारवाई करीत सर्वांच्या आरोग्यासाठी कायदाचा बडगा उगारला. मुख्य बाजारपेठेत त्यांनी दोन दुकानात जाऊन पाहणी केली. मास्क न घातलेल्या दुकानदारांना प्रत्येकी ५-५ हजारांचा दंड त्यांनी ठोठावला. याचबरोबर रस्त्यावर असणारे फळ विक्रेते, अंडे विक्रेते व विनामास्क फिरणाऱ्या लोकांशी त्यांनी संवाद साधून “मी जबाबदार” च्या कर्तव्याची जाणीव करुन दिली.

परभणी जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती अधिक गंभीर होऊ नये यादृष्टिने जिल्ह्यातून विदर्भात जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व वाहतुकीला निर्बंध घातले असून कोणतेही वाहन जाण्या-येण्यास मज्जाव केला आहे. ज्या तातडीच्या सेवा-सुविधा असतील त्या विचारात घेऊन प्रवेश करण्यापूर्वीच त्यांची अँटिजन टेस्टींग बंधनकारक केली आहे. परभणी जिल्ह्याच्या सिमांवर विशेष चौकी लावण्यात आली असून त्याठिकाणी पोलिसांमार्फत निगराणी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या