मराठा आरक्षणाअभावी हतबल युवकाचा बळी; नरेंद्र पाटलांचे सरकारला भावनिक आवाहन

narendra patil

जालना : काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे अनेक मराठा युवक निराश झाले आहेत. अशातच परतूर (जि.जालना) आष्टी येथील येणोरा गावातील एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. शिवाय मराठा आरक्षण नसल्याने नोकरी मिळत नव्हती. अशा दुहेरी संकटात सापडलेल्या हतबल युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

सदाशिव शिवाजी भुंबर असे मृत तरुणाचे नाव असून तो केवळ २२ वर्षांचा होता. सदाशिवने इलेक्ट्रिशनचा कोर्सही केला होता. पण मराठा समाजाला आरक्षण नसल्याने त्याला सरकारी नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे तो गावी परतला होता.

याबाबत मराठा समाजाचे नेते नरेंद्र पाटील यांनी याबाबत भाष्य करताना राज्य सरकारला भावनिक आवाहन केलं आहे. ‘जालना जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण सदाभाऊ भुंबरने मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याने, नैराश्यातून आत्महत्येसारखं पाऊल उचलले आहे, आता तरी सत्ताधाऱ्यांनी जागे व्हावे आणि लाखो तरुणांच्या सहनशक्तीचा फक्त तमाशा न बघता कृती करावी आणि मराठा समाजाला न्याय द्यावा,’ अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी ट्विट करून केली आहे.

घरची स्थिती अत्यंत हलाखीची –

गावी शेती करत असताना पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. नोकरी नाही, वरून आर्थिक संकट कोसळल्याने तो हवालदिल झाला. यामुळे सदाशिवने आपल्या घरातील लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने टोकाचे पाऊल का उचलावे लागले याचा खुलासा केला आहे. त्याच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या