व्यंकय्या नायडू एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार

वेबटीम: राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे . दिल्लीत झालेल्या भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली आहे. मंगळवारी ते उपराष्ट्रपतीपदाचा अर्ज दाखल करणार आहेत.

व्यंकय्या नायडू हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. मोदी सरकारमध्ये नायडूं यांच्याकडे नगरविकास मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी आहे. त्यांनी 2002 ते 2004 या काळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे.

पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात नायडूंकडे ग्रामविकास मंत्रालयाची जबाबदारी होती. दक्षिण भारतातील भाजपचे महत्वाचे नेते म्हणून व्यंकय्या नायडूंकडे पाहिलं जातं. नायडूंना 25 वर्षांपेक्षा जास्त काळाचा संसदीय कामकाजाचा अनुभव आहे.

दरम्यान आज राष्ट्रपतीपदासाठी मतदान घेण्यात आल आहे. याची मतमोजणी २० जुलै रोजी करण्यात येणार आहे.