वेल्हा तालुक्याचे पुन्हा राजगड असे नामकरण व्हावे, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वेल्हा तालुक्याचे पुन्हा एकदा राजगड असे नामकरण व्हायला हवे. अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. जनता देखील या मागणीबाबत सकारात्मक आहे. आपण यावर लवकरचं सकारात्मक निर्णय घेऊन वेल्हा तालुक्याचे नाव राजगड करावे विनंती त्यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी असा ज्याचा लौकीक आहे तो किल्ले राजगड वेल्हा तालुक्यात आहे. येथूनच शिवरायांनी दोन दशकांहून अधिक काळ कारभार पाहिला. स्वराज्याचे स्वप्न पाहिले,जपले व ते प्रत्यक्षात आणले.
दरम्यान राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्वाच्या किल्ल्यांपैकी आहे. तर राजगड हे शिवाजी महाराजांची सुरवातीची राजधानी होती. शिवरायांनी दोन दशकांहून अधिक काळ याच किल्ल्यातून राज्य कारभार केला. तर स्वराज्य विस्ताराची स्वप्न पाहिली होती. आणि ती प्रत्यक्षात देखील उतरवली.

वाचा काय आहे राजगडचा इतिहास ?

राजगड किल्ला इसवी सनाच्या पहिल्या शतकातला आहे. डोंगराला किल्ल्याचे स्वरुप गौतमीपुत्र सातकर्णी याने दिले. बहुधा सन १६४५ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व त्याचे नाव राजगड ठेवले. मराठेशाहीची २५ वर्षे राजधानी याव्यतिरिक्त सदर किल्ल्यावर शिवाजीमहाराजांनाचे धाकटे चिरंजीव राजारामाचा जन्म व सईबाईंचे निधन या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र असून, हा बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदावी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे.नंतर राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी त्यामानाने ऐसपैस आणि दुर्गम अशा रायगडावर नेली.

राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती. पुणे शहराच्या नैर्ऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील भोर गावाच्या वायव्येला २४ किमी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. मावळभागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती,म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली.