पुण्यामध्ये टोळक्याकडून वाहनांची तोडफोड

पुणे: पुण्यामध्ये पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड करत दहशत पसरवण्याचा प्रकार घडला आहे. पुण्यातील वारजे रामनगर परिसरात रविवारी (दि.18) रात्रीच्या सुमारास सात ते आठ जणांच्या टोळक्याने रस्त्यावर लावलेल्या वाहनांची तोडफोड केली आहे. या टोळक्याने एकावर हल्ला देखील केला असून या तोडफोडीत दहा ते बारा वाहनांचे नुकसान झाले आहे.

बाळू दत्तू आवटे (वय.४८ रा. रामनगर, वारजे, पुणे) असे हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अचानक झालेल्या प्रकारामुळे वारजे परिसरात एकच खळबळ उडाली होती. नागरिक आपापल्या घराचे दरवाजे बंद करून बसले होते. जखमीला उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान वारजे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत.