मार्केट यार्ड बंद असल्यामुळे भाजीपाल्याचा तुटवडा ; फक्त पाच गाड्यांची आवक

पुणे : अडते असोसिएशन आणि कामगार संघटना बंद पुकारल्याने आज मार्केट यार्डात भाजीपाल्याची पाच गाड्यांची आवक झाली. त्यात मार्केट यार्डात ग्राहक नसल्याने शेतकरी हा माल पिंपरी चिंचवड येथील बाजारात घेऊन गेले. शहरासह उपनगरात भाजीपाल्याचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव वाढत आहेत.

आज गुढी पाडव्याचा सण असल्याने ग्राहकांनी घराच्या बाहेर पडणे टाळले. मोदींनी रात्री लॉक डाऊनची घोषणा केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु त्यानंतर जीवनावश्यक वस्तू चालू राहणार असल्याने थोडाफार दिलासा मिळाला. रात्रीच्या वेळी ग्राहकांनी किराणा दुकाने, भाजीपाला दुकानामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. परंतु आज सकाळी शहरातील जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकाने चालू होती. त्यामुळे काहीप्रमाणात नागरिकांनी सकाळच्या वेळेत भाजीपाला, किराणा आणि दुधाची खरेदी केली.

मार्केट यार्डात भाजीपाल्याची आवक नसल्याने शहरासह उपनगरात तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव कडाडले आहेत. भुसार बाजार बंद असल्याने किराणा दुकानातील माल संपुष्टात येत आहे. त्यामुळे किराणा मालाचे भाव ही वाढत आहेत. पुढील काही दिवस मार्केट यार्ड बंद राहिले तर शहरासह उपनगरात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला आणि धान्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यायाबत प्रशासनाने योग्य दखल घ्यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

बहुतांश फळभाज्यांच्या किलोच्या दराने शंभरी ओलांडली आहे. तर काही भाज्यांचे दर 150 रुपयांपर्यत पोहचले आहेत. पालेभाज्याच्या गड्डीचे दर 50 ते 30 रुपयांपर्यत पोहचले आहेत. वाढलेल्या दरामुळे भाज्या खरेदी करताना सर्वसामान्यांचा खिसा रिकामा होते आहे.

कोरोना विषाणूच्या भितीने शेतकऱ्यांनी बाजारात माल विक्रीला आणणे थांबविले आहे. त्यामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात भाज्यांची विक्री करणाऱ्याला घाऊक बाजारात भाज्यांच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्व पेठा, शिवाजीनगर, कोथरुड, वारजे-माळवाडी, कोरेगावपार्क, कर्वेनगर, कात्रज, बालाजीनगर, पद्मावती, पुणे स्टेशन परिसरात भाज्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्केटयार्डातील आडत्यांनी शुक्रवार, शनिवारी बाजार बंद ठेवला होता. रविवारी देश बंद होता. त्यामुळे सोमवारी बाजारात अत्याअल्प आवक झाली. सतत चार दिवस भाज्यांची आवक न झाल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेतेही अव्वाच्या सव्वा दरांने भाज्यांची विक्री करीत आहेत. त्याचा फटका ग्राहकांना सहन करावा लागत आहे.