सणासुदीच्या दिवसात भाज्यांचे भाव वधारले; टोमॅटो-कांद्याचे भाव कडाडले

सणासुदीच्या दिवसात भाज्यांचे भाव वधारले; टोमॅटो-कांद्याचे भाव कडाडले

महागाई

नवी दिल्ली : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिवसगणित मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पेट्रोलच्या किमतीने याआधीच शंभरी गाठली असून, आता डिझेलने देखील शंभरी गाठली आहे. तसेच सीएनजी-एलपीजीच्या भावाचा आलेख सुद्धा चढता आहे. घरगुती वापरातील गॅस, तेलाच्या किमतीनंतर आता सणासुदीच्या काळात कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीरचे दर वधारले आहेत.

भाज्यांच्या घाऊक दरात 10 ते 15 रुपये प्रतिकिलोनं वाढ झालेली आहे. किरकोळ बाजारात हे दर 15 ते 20 रुपयांनी वधारले असून, अशीच परिस्थिती कायम राहिल्यास येत्या काळात उपभोग्य वस्तू आणखी महाग होऊ शकतात, असं भाजीपाला व्यापाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांचे वाढत्या महागाईमुळे कंबरडे मोडले आहे. डिझेलच्या किमतीत वाढ झाल्यानं वाहतुकीचा खर्च वाढला आहे. परिणामी भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.

त्या तुलनेत रविवारी कांद्याचे सरासरी दर 39 रुपये झाला. एक वर्षापूर्वी कांद्याचे सरासरी दर 46 रुपये प्रतिकिलो दर होता. दिल्ली, मुंबई आणि चेन्नईसारख्या काही शहरांमध्ये रविवारी कांद्याचा दर 50 ते 65 रुपये प्रतिकिलो होता. त्याचप्रमाणे टोमॅटोच्या दरातही वाढ झाल्याचं दिसून आलं.

तर रविवारी टोमॅटोचा दर 45 रुपये किलो होता. मागील महिन्यात सप्टेंबरमध्ये हेच दर 27 रुपये प्रतिकिलो तर मागील वर्षी याच कालावधीत हे दर 41 रुपये प्रतिकिलो होते. सध्या कांदा, बटाटा आणि टोमॅटोचे दर हे गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्याचं रविवारी ग्राहक व्यवहार मंत्रालयानं निवेदनाद्वारे स्पष्ट केल आहे. कोथिंबीरची जुडी 100 ते 120 रुपये दराने विकली जात आहे. दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात नवी आवक सुरू होताच कोथिंबीर दरात घट होईल, अशी शक्यता वर्तवली गेली आहे.

महत्वाच्या बातम्या