पुणे शहरात भाज्यांचा तुटवडा, विक्रमी दराने खरेदी आवाक्याबाहेर

पुणे : शहराच्या मध्यवस्तीसह उपनगरात फळ व पालेभाज्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी सर्वच प्रकारच्या भाज्यांचे दर गगणाला भिडले आहेत. बहुतांश फळभाज्यांच्या किलोच्या दराने शंभरी ओलांडली आहे. तर काही भाज्यांचे दर 150 रुपयांपर्यत पोहचले आहेत. पालेभाज्याच्या गड्डीचे दर 50 ते 30 रुपयांपर्यत पोहचले आहेत. वाढलेल्या दरामुळे भाज्या खरेदी करताना सर्वसामान्यांचा खिसा रिकामा होते आहे.

कोरोना विषाणूच्या भितीने शेतकऱ्यांनी बाजारात माल विक्रीला आणणे थांबविले आहे. त्यामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात भाज्यांची विक्री करणाऱ्याला घाऊक बाजारात भाज्यांच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्व पेठा, शिवाजीनगर, कोथरुड, वारजे-माळवाडी, कोरेगावपार्क, कर्वेनगर, कात्रज, बालाजीनगर, पद्मावती, पुणे स्टेशन परिसरात भाज्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्केटयार्डातील आडत्यांनी शुक्रवार, शनिवारी बाजार बंद ठेवला होता. रविवारी देश बंद होता. त्यामुळे सोमवारी बाजारात अत्याअल्प आवक झाली. सतत चार दिवस भाज्यांची आवक न झाल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेतेही अव्वाच्या सव्वा दरांने भाज्यांची विक्री करीत आहेत. त्याचा फटका ग्राहकांना सहन करावा लागत आहे.

किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे-हिरवी मिरची-160,,शेवगा-120,गवार – 100,वाटाणा-120,वांगी- 80,फ्लाॕवर- 80, दोडका-80,कोबी-80,कांदा-80,बटाटा- 60. पालेभाज्यांचे गड्डीचे दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर-50,मुळा -40,मेथी -30,कांदापात -30,अंबाडी-30,चाकवत-30