आदित्य ठाकरेंची कल्पना आली कामाला, पेंग्विनने वाढवले राणीच्या बागेचे उत्पन्न

टीम महाराष्ट्र देशा: युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भायखळा येथील राणीची बाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात विदेशी पेंग्विन आणण्याची कल्पना मांडली होती, आदित्य यांच्या कल्पनेनुसार करोडो रुपये खर्च करत आठ पेंग्विन बागेमध्ये आणण्यात आले. विरोधकांकडून ठाकरे यांना अनेकवेळा टार्गेट देखील करण्यात आले. आता याच पेंग्विनमुळे उद्यानाचे उत्पन्न तब्बल पाच पटींने वाढले आहे.

पेंग्विन आणण्याआधी उद्यानाचे वार्षिक ७३ लाखांच्या आसपास होते. तर आता हेच उत्पन्न पर्यटकांची संख्या वाढल्याने पाच पटीने वाढले आहे. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाचं वर्षिक उत्पन्न आता पाच कोटींवर पोहोचलं आहे. पेंग्विनसह इतरही अनेक पक्षी, प्राणी उद्यानात आणले जात आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात पेंग्विन आणण्याची योजना मांडली होती, सुरुवातीला आपल्याकडील हवामानामुळे पेंग्विन तग धरू शकणार नसल्याचा दावा अनेकांनी केला होता. मात्र अखेर जुलै २०१६ मध्ये आठ पेंग्विन बागेमध्ये आणले गेले. यामध्ये ३ मेल तर पाच फिमेल पेंग्विनचा समावेश आहे. ऑक्टोबर २०१६ मध्ये यातील एका फिमेल पेंग्विनचा मृत्यू झाला होता.

पेंग्विनच्या मृत्यूनंतर मनसेकडून कडाडून टीका करण्यात आली होती, आदित्य ठाकरे यांनी जनतेचे करोडो रुपये वाया घालवल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला होता. तर सोशल मिडीयावर देखील आदित्य ठाकरे यांना अनेकवेळा ट्रोल करण्यात आले आहे.

अखेर आता दोन वर्षांनतर आदित्य यांनी कल्पना कामाला आल्याचं दिसत आहे. उद्यानात फेरफटका मारायला येणाऱ्यांची संख्या वाढलीय. त्यामुळे वार्षित उत्पन्न थेट चार-पाच कोटींवर पोहोचले आहे.