“वनराई” करणार ‘बहिरवाडी’ गावाचा कायापालट

पुणे :  ऑगस्ट: पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथील बहिरवाडी या संपुर्ण गावाचा कायापालट करण्याचे ‘वनराई’ने ठरविले आहे. युपीएस एससीएस (इंडीया) प्रा. लि. यांच्यातर्फे आर्थिक मदतीने वनराई या गावातील लोकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करणार आहे.

पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला बहिरवाडी हे ५५० ते ६०० लोकवस्तीचं गाव आहे. गावात आदिवासींची लोकसंख्या जास्त आहे. गावामध्ये द्रारिद्र्यरेषेखालील आणि जमीनी नसलेली कुटुंब आहेत. येथील लोकांचे शेती आणि दुग्धव्यवसाय हे मुख्य उत्पन्नाचे साधन आहे. गावात रोजगाराचे कायमस्वरूपी साधन नसल्याने लोकांनी मजूरीसाठी गावातून इतर शहरात लोकांनी स्थलांतर केले आहे. पानलोटाची कामे झाली नसल्यामुळे डोंगरपायथ्याशी असलेल्या या गावात पावसाचे पाणी वाहून जाते. त्यामुळे गावात शेती आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे.

वनराईचे प्रकल्प संचालक प्रकाश जगताप म्हणाले, एकंदरीत गावाच्या विकासासाठी आणि तेथील नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी ‘वनराई’ तर्फे विविध उपक्रम या गावामध्ये राबविले जाणार आहेत. यामध्ये पाणलोट व्यवस्थापनाचं कार्य, पाणी अडविण्या-मुरविणे, सिमेंट बंधारे, गॅबियन बंधारा, सलग समपातळी चर, लूज बोल्डर स्ट्रक्चर्स, विहिरींचे पुनर्भरण तसेच ‘वनराई बंधारे’ गावात बांधण्यात येणार आहेत.

पशुधन विकासाच्या दृष्टीने जनावरांचे कृत्रिम रेतन करणे, चारा पिकाखालील क्षेत्र वाढविणे, दुभत्या जनावरांची संख्या वाढविणे इत्यादी बाबींवरदेखील ‘वनराई’च्या माध्यमातून विशेष भर देण्यात येणार आहे. सांडपाण्याचा निचरा, परसबागा तयार करण्याबरोबर वनीकरण, पाणलोट व्यवस्थापनासह शेती व पशुधन विकासासाठी प्रशिक्षण कार्यक्रम, शिबिरे व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. गावातील विविध उपक्रम राबविण्याकरिता युपीएस एससीएस (इंडीया) प्रा. लि. यांच्यातर्फे ३८ लाखांचा निधी ‘वनराई’ला देण्यात आला असल्याची माहिती जगताप यांनी दिली.

You might also like
Comments
Loading...