‘वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार निवडूण येणार नाही’

prakash aambedkar

टीम महाराष्ट्र देशा : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी करत मतदारांना तिसरा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे प्रकश आंबेडकर आणि त्यांचा पक्ष राज्यभरात जोरदार प्रचार करताना दिसत आहे. तर दुसरीकडे ज्येष्ठ विचारवंत भालचंद्र मुगणेकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार निवडूण येणार नसल्याचा दावा केला आहे.

याबाबत मुगणेकर म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पाडण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचे 48 उमेदवार उभे केले आहेत. पण या 48 उमेदवारांपैकी एकही उमेदवार निवडणुकीत निवडूण येणार नाही. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव वापरून प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले राजकारण करत आहेत, अशी टीका मुगणेकर यांनी केली आहे. मात्र राज्यात प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांना न मानणारा दलित समाज देखील आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीची मतं कमी होणार नसल्याचं देखील मुगणेकर यावेळी म्हणाले.

दरम्यान राज्यामध्ये काही ठिकाणी तेहेरी लढत होण्याची शक्यता आहे. कारण वंचित बहुजन आघाडीमुळे मतदारांना तिसरा पर्याय उपलब्ध झाला आहे. मात्र या तिसऱ्या पर्यायाचा फटका कॉंग्रेस आघाडीला बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण वंचित आघाडी मुळे कॉंग्रेसच्या हक्काच्या वोट बँकला धक्का लागणार आहे. म्हणजेच दलित आणि मुस्लीम मतांच विभाजन होणार आहे.त्यामुळे वंचित बहुजन आघाडी हा पर्याय कॉंग्रेस आघाडीसाठी डोके दुखी ठरत असून भाजप- सेना युतीसाठी वरदान ठरत आहे.