वजुभाई वाला निष्ठावान कुत्रा; निरुपमांची जीभ घसरली

Sanjay Nirupam

मुंबई- कर्नाटकमध्ये भाजपने १०४ जागा निवडून आणत सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान मिळवला होता. मात्र भाजपकडे पूर्ण बहुमत नसताना भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष असल्याच्या निकषावर राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापनेसाठी बोलावले होते. मात्र त्याचवेळेस कॉंग्रेसने जेडीएसची युती करून बहुमताचा दावा केल्यानंतर देखील त्यांना राज्यपालांकडून सत्ता स्थापनेची संधी देण्यात आली नव्हती.

दरम्यान काल भाजपचं अल्प मतातील सरकार कोसळल्यानंतर विरोधी पक्षांकडून भाजप आणि राज्यपाल वजुभाई वाला यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी वजुभाई वाला यांच्या निर्णयावर टीका करताना अत्यंत वादग्रस्त विधान केले.या देशात वजुभाई वाला यांनी निष्ठावान, प्रामाणिकपणाचा नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. यापुढे भारतातला प्रत्येक व्यक्ति आपल्या कुत्र्याच नाव वजुभाई वालाच ठेवेल कारण त्यापेक्षा कोणी प्रामाणिक असूच शकत नाही असे निरुपम म्हणाले.

दरम्यान संजय निरुपम यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.तुम्ही संविधानिक पदावर असताना कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी तुमच्यावर असते. जर तुमच्याकडून कायद्याचे पालन होत नसेल तर तुम्ही राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी देखील निरुपम यांनी यावेळी केली.