आदिवासींच्या ‘खावटी’ साठी वैभव पिचड यांचा आक्रमक पवित्रा!

pichad

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- लॉकडाउन काळात आदिवासींना दिलासा मिळेल, या अपेक्षेने सर्व मार्ग वापरून लढा दिला, तदनंतर शासनाने आदिवासींना खावटी देण्याचे जाहीर केले. मात्र आज लॉकडाऊन होऊन ८  महिने उलटून गेले, तरी शासन कागदी घोडे नाचवत असल्याने आदिवासींची खावटी ही कागदावरच राहिली आहे.

गेले आठ महिने होऊनही आदिवासींच्या हातात खावटी मिळत नाही. दसरा गेला, दिवाळी गेली, ओवाळीही संपली आता आदिवासींच्या सहनशीलतेचा सरकारने अंत पाहू नये, असा इशारा अकोलेचे माजी आमदार वैभव पिचड यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात पिचड यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊन काळात आदिवासी उपाशी मरत असताना आदिवासी विकास विभागाने एकही रुपया आदिवासींना जगविण्यासाठी प्रकल्प कार्यालयांना दिला नाही. लॉकडाऊन झाल्याने सर्वांचाच रोजगार हिरावला आहे. या काळात रोजंदारीवर काम करणाऱ्या आदिवासींच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला.

दिवाळीमध्ये खावटी मिळणे आवश्यक असताना आदिवासी विकास कर्मचारी, शिक्षकांना दिवाळीत सर्व्हे व फॉर्म भरण्यास सांगितले, मात्र कर्मचाऱ्यांची दिवाळी नाही व लाभार्थ्यांची ही दिवाळी नाही, असे नियोजन सरकार करत असून, गरीब, कष्टकरी, उपेक्षित, विधवा, अंध, अपंग आदिवासींची चेष्टा करत आहे, असे पिचड यांनी निवेदनात म्हटले आहे.

तसेच आदिवासी विकास विभाग व सरकारच्या निष्क्रिय कार्यपद्धतीबाबत आदिवासींमध्ये संतापाचे आणि नैराश्याचे वातावरण आहे. आदिवासींच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याची चूक आदिवासी विकासमंत्री करीत असून, हे दुर्दैवी आणि तीव्र आंदोलनाला आमंत्रण देण्याचा प्रकार आहे, असे सूचक वक्तव्य पिचड यांनी केले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील आदिवासींना तातडीने खावटी कर्ज मिळावे, अशी मागणी राज्यभरातून होत आहे. केवळ आश्वासने देऊन चालणार नाही, तर आदिवासींना मदत मिळावी, अशी मागणी आदिवासी समाजातून होत आहे.

महत्वाच्या बातम्या