देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिरातच दिली जात आहे लस

देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिरातच दिली जात आहे लस

नाशिक – कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सध्या राज्यात चांगलाच वेग आला असून नाशिक जिल्ह्यानेही लसीकरणासाठी कंबर कसली आहे. नवरात्रौत्सवादरम्यान देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या ज्या भाविकांनी लस घेतलेली नाही, त्यांना मंदिरातच लस दिली जात आहे. नाशिक इथल्या सप्तशृंगी गड आणि चांदवड इथल्या रेणुका देवी मंदिरात येणाऱ्या भाविकांना दर्शनानंतर काल लस देण्यात आली. जिल्ह्यात आत्तापर्यंत 40 लाख नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं असून 11 लाख नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. तर 29 लाख नागरिकांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे.

दुसऱ्या बाजूला पुण्यात उद्यापासून शहरातल्या विविध महाविद्यालयांमधूनही विशेष लसीकरण शिबिरांचं आयोजन केलं जाणार आहे. ज्यांनी अद्यापपर्यंत लसीची एकही मात्र घेतलेली नसेल किंवा दुसरी मात्रा घेण्याची वेळ आली असेल त्यांना महाविद्यालयातच लस देण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी सांगितलं.

दरम्यान, देशात आतापर्यंत 95 कोटी 14 लाखांहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. देशात काल 46 लाख 46 हजारांहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या. लसींच्या 100 कोटी मात्रा देण्याच्या दिशेने भारत वेगानं वाटचाल करीत असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. जगातील ही सर्वात मोठी लसीकरण मोहिम पूर्ण क्षमतेनं सुरु असून लोकांनी त्वरेनं लस घ्यावी तसंच आपले कुटुंबीय आणि मित्रांना देखील लस घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावं असंही मांडवीय यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या