औरंगाबादेत लसींचा तुटवडा, ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण बंद!

औरंगाबाद : अठरा वर्षांवरील युवकांच्या लसीकरणास शनिवार (दि.१) पासून औरंगाबाद महानगरपालिकेने थाटामाटात सुरुवात केली. पहिल्याच दिवशी तिन केंद्रांवर एकुण १३९ अठरा प्लस नागरिकांनी लस टोचून घेतली. मात्र लसींचा साठा संपत आल्याने आज (दि.३) ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होणार नाही. मात्र शहरातील तीन आरोग्य केंद्रांवर १८ प्लस नागरिकांचे लसीकरण सुरु राहणार आहे असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने शहरातील तीन आरोग्य केंद्रात १८ ते ४४ वयोगटातील वर्गासाठी लसीकरण सुरु करण्यात आले आहे. प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशान्वये मुकुंदवाडी, कैसर कॉलनी, व सादातनगर येथील आरोग्य केंद्रात पहिल्या टप्प्यात लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यात पहिल्याच दिवशी १३९ जणांनी लस घेतली. मनपाच्या या तिन्ही केंद्रात सकाळी १० ते ४ या वेळेत १८ वयोगटाच्या पुढील नागरिक लस घेऊ शकतील. अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

लस घेण्यासाठी लाभार्थ्यांनी कोविन ॲप वर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. दररोज केवळ १०० लाभार्थ्यांना प्रत्येक केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे. कोविन ॲप वर आपण अपॉइंटमेंट ऑप्शन सिलेक्ट करावे. त्या ठिकाणी शहरातील तिन्ही आरोग्य केंद्राची नावे दिसतील. लाभार्थ्यांनी आपल्या जवळील एका केंद्राला सिलेक्ट करायचे आहे.

नोंदणीशिवाय १८ ते ४४ वयोगटातील नागरिक लस घेऊ शकत नाही. सध्या शहरात लसींचा ठणठणाट आहे. दिड लाखांची मागणी असतांना शहरास केवळ काही हजारांमध्ये लस मिळत आहेत. त्यामुळे हि मोहिम सुरु तर झाली मात्र यात सातत्य ठेवत १८ प्लस युवावर्गाचे लसीकरण करणे हे मनपासमोरचे मोठे उद्दिष्ट आहे.

महत्त्वाच्या बातम्या