औरंगाबादेत लसीकरणाचा खेळखंडोबा, लाट ओसरताच नागरिकांकडून लस घेण्यास टाळाटाळ

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी १८ ते ४४ वयोगटातील नागरिक महापालिकेकडे चकरा मारत आहेत. मात्र शासन आदेशानुसार सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटाला माघारी परतावे लागत आहे. ४५ वर्षांवरील व्यक्ती लस घेण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे महापालिकेकडे पडून असलेल्या लसींची संख्या ३५ हजार एवढी झाली आहे.

कोरोना संसर्गाचा दुसऱ्या लाटेत लस घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. अनेक केंद्रावरील गर्दीत भांडणे देखील झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र दुसरी लाट ओसरताच आता लसीकरण केंद्रे ओस पडताना दिसून येत आहेत. महापालिकेकडे सध्या ३५ हजार लसी उपलब्ध आहेत मात्र ४५ वर्षावरील नागरिक लस घेण्यासाठी फिरकत नसल्याचे चित्र आहे. मात्र जोपर्यंत शहरात १०० टक्के लसीकरण होत नाही तोपर्यंत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे.

१६ जानेवारीपासून देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. मात्र केंद्र शासनाने आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लसीकरणाची गती वाढविण्यात आली. एक मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. त्यानंतर लसीकरणाला मोठा प्रतिसाद मिळाला. शहरात एकाच दिवशी तब्बल दहा हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी घेतली. मात्र त्यानंतर लसींच्या कमतरतेअभावी १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण स्थगित करण्यात आले.

सध्या पंचेचाळीस वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू ठेवण्यात आले. मात्र त्यातही कोविशिल्ड लसींमधील अंतर ८४ दिवस करण्यात आले. तेव्हापासून लसीकरणाची गती मंदावलेली आहे. महापालिकेने ड्राईव्ह इन लसीकरण मोहीम सुरू केली आहे. त्यासोबतच दिव्यांग, बेघर ज्यांच्याकडे ओळखपत्र नाहीत. अशा नागरिकांचेही लसीकरण केले जात आहे. मात्र या मोहिमेला ही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासन हतबल झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP